‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण अडचणीत : दुकानातही तुटवडानागपूर : ढगाळ वातावरणामुळे स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे. एकट्या मेडिकलमध्ये मागील महिन्यात दोन जणांचा मृत्यू तर सहावर जण पॉझिटिव्ह आले आहेत. यातच संशयित रुग्णांचीही संख्या वाढत असतानाच शासकीय रुग्णालयांसोबतच औषधे दुकानांमध्ये या संसर्गजन्य रोगावरील औषधांचा दुष्काळ पडला आहे. गणेशोत्सवात होणाऱ्या गर्दीमुळे स्वाईन फ्लूच्या ‘एच १एन १’ विषाणूंचा संसर्ग वाढण्याचा धोकाही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. राज्यात २००९ मध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. तेव्हापासून सार्वजनिक आरोग्य विभाग या रोगावर रामबाण ठरलेले ‘टॅमी फ्लू’ औषध सर्व शासकीय रुग्णालयांत मागणीनुसार पाठवित होते. परंतु मागे पाठविण्यात आलेल्या या औषधांच्या साठ्यांची मुदत ३१ आॅगस्ट रोजीच संपली. सर्वच शासकीय रुग्णालयांनी नवीन साठ्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविला. परंतु अद्यापही औषधे उपलब्ध झालेली नाही. शहरात स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशी स्वाईन फ्लूची लक्षणे असलेला रु ग्णही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. औषधेच नसल्याने अशा रुग्णांवर उपचार कसा करावा, या अडचणीत मेडिकलचे डॉक्टर सापडले आहेत. विशेष म्हणजे, हे औषध रुग्णांना बाहेरून विकत घेण्यास सांगितले जात आहे. परंतु बाहेर एका गोळीची किमत ३५० ते ४०० रुपये आहे. यामुळे सामान्य रुग्ण औषधापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. मेडिकलच्या औषधी विभागाने यासंदर्भात आरोग्य उपसंचालकांना पत्र दिले आहे. काही औषध निर्माण कंपन्यांशीही बोलणी केली, परंतु त्यांनीही हातवर केले आहे. शहरातही अनेक औषध दुकानात ‘टॅमी फ्लू’ नाही. ज्यांच्याकडे औषधे उपलब्ध आहे ती खरेदी करणे गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहे. यामुळे रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
‘टॅमी फ्लू’ औषधाचा दुष्काळ
By admin | Published: September 07, 2014 12:56 AM