भातसानगर : शहापूर तालुक्यात नव्याने येणार्या धरण प्रकल्पांना पुनर्वसनाच्या प्रश्नावरून विरोध होत असतानाच ब्रिटीश राजवटीत मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेल्या तानसा धरण क्षेत्रातील गावातील बहुसंख्य आदिवासी बांधवाना आजही दिवसभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तानसा परिसरातील सावरदेव, उंबरपाडा, नांदगाव, हेदूचापाडा, वैगेरे अनेक गावातील ग्रामस्थ धरणातील पाणी साठ्याच्या मागील भागात नदीच्या कोरड्या पडलेल्या पात्रात खड्डे खोदून त्यातील पाण्यावर आपली गरज भागवत असून आज खोदलेला खड्डा उद्या कोरडा पडत असल्याने तो पुन्हा नव्याने खोदण्याचा उद्योग दररोज करावा लागत आहे. ऐरवी पाण्यासाठी हंडा, कळशी, घेऊन जाणाऱ्या महिलांना आता जोडीला टिकाव किंवा कुदळ बरोबर घेऊन भटकंती करावी लागत आहे.या परिसरातील सावरदेव गावातील एकमेव २० ते २२ फुट खोल असलेल्या विहिरीने कधीच तळ गाठला असल्याने एक माणूस या विहिरीत उतरतो आणि लहान भांड्याद्वारे लामण्यात (वरून दोरी बांधून खाली सोडलेल्या डब्यात) पाणी भरतो ते वर खेचून हंड्यात ओतले जाते.अशा पद्धतीने एक हंडा भरण्यास किमान एक तास लागत असल्याने हंडा-कळशांची लागलेली लांबच लांब रांग आणि महिलांचा कायम चालू असलेला कलकलाट हे दृश्य येथे नेहमी दिसते आहे. धरण उशाला, कोरड घशाला असे चित्र खऱ्या अर्थाने येथे पहावयास मिळते आहे, धरणाच्या कुशीत वसलेल्या या आदिवासी पाड्यांमधील महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती केव्हा थांबेल, हा एकच प्रश्न येथील आदिवासी जनतेला पडला आहे. (वार्ताहर)
तानसा धरणक्षेत्रात हंडा, कळशी अन टिकाव, कुदळसुद्धा...!
By admin | Published: April 29, 2016 4:02 AM