ऑनलाइन लोकमत
घोटी (नाशिक), दि.17 - मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचे पुढील टायर फुटल्याने हा टँकर दुभाजक ओलांडून मुंबईकडे जाणाऱ्या एका वाहनावर अदळल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली. घोटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकर चालक फरार आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर आज संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या गैस टँकर क्र. जी.जे. 12 ए.डब्लू. 0976 याचा अचानक पुढील टायर फुटल्याने हा टँकर दुभाजक ओलांडून नाशिककडून मुबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हुंडाईची असेन्ट कार क्र. एम.एच.48 एफ. 3073 या वाहनावर आदळून गंभीर अपघात झाला. या अपघातात असेन्ट वाहनामधील समीर शेख वय 38 व संजय कुमार शुक्ला वय 27 हे दोघे जण जागीच ठार झाले तर खत्री (नाव पत्ता समजू शकले नाही) हा गंभीर जखमी झाला. या जखमीला तातडीने पुढील उपाचारार्थ घोटी पोलिसांनी नाशिक च्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
महामार्ग एक तास ठप्प
दरम्यान हा भीषण अपघात झाल्यानंतर इगतपुरी तालुक्यातील एकही रुग्ण वाहिका अथवा आपातकालीन यंत्रणा वेळीच घटनास्थळी हजर न झाल्याने महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला.
मृतदेह बाहेर काढण्याचे आव्हान
या असेन्ट वाहनावर महाकाय टँकर धडकल्याने हे वाहन टँकरखाली अडकले होते व यातील प्रवाशीही दबले होते. त्यांना बाहेर काढण्याचे गंभीर आव्हान पोलीस व नागरिकासमोर उभे राहिले होते. मात्र पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने असेन्ट वाहनाचे दरवाजे तोडून, काचा फोडून या जखमी व मृतांना बाहेर काढले.