नंदुरबार / धुळे : नर्मदा आणि तापी नदीच्या पाण्याचा योग्य आणि पुरेपूर वापर करून येत्या काळात जिल्ह्यातील एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे, तसेच जलयुक्त शिवारातील कामे दुष्काळ निवारणासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आढावा बैठकीनंतर व्यक्त केला. नंदुरबार जिल्ह्यातील धांद्रे, ठाणेपाडा येथील जलयुक्त शिवार कामांची मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. जलयुक्त शिवारातील कामांमुळे चांगले परिणाम दिसून येत आहे. जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्नही गंभीर असल्याने तो सोडविण्यासाठी रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. इतर प्रश्नांबाबत छेडले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. नोव्हेंबर महिन्यात मी पुन्हा जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यावेळी इतर विषयांवर बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्याचे खासदार, आमदार व प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांची गाडी अडविलीकापसाला ७ हजार रुपये भाव देण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना शिरपूर विमानतळावर देण्यास आडकाठी झाल्याने काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी नंदुरबारकडे जाणारा मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवून महामार्गावर त्यांना निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांच्या वतीने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी निवेदन स्वीकारले. शिरपूर विमातनळावर गेलो असताना आ. जयकुमार रावल व पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांनी निवेदन देऊ दिले नाही, रस्त्यावर निवेदन देताना साहेबराव पाटील यांनी धक्काबुक्की केली, असा आरोप सनेर यांनी केला.
तापी, नर्मदेच्या पाण्याचा पूर्ण वापर
By admin | Published: October 24, 2015 3:17 AM