पंकज राऊत। लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : सर्वात मोठ्या क्षमतेची १३ वर्षांपूर्वी सुरू केलेली तारापूर येथील अणुभट्टी क्र.-४ मध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, २४ मेपासून ती बंद असल्याने वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. तिची तपासणी सुरू असून, लवकरच बिघाडाचे निश्चित कारण समजेल, असे उत्तर अणुऊर्जा प्रशासनाकडून देण्यात आले.२४ मे २०१७ रोजी अणुभट्टी क्र. - ४ च्या शटडाउनदरम्यान देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना, जड पाणी आणि किरणोत्सर्गी द्रव्याची गळती होऊन, तेथे काम करणाऱ्या कामगारांना किरणोत्सर्गाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती, परंतु बाधित कामगारांना झालेल्या किरणोत्सर्गाच्या बाधेचे प्रमाण, अणुऊर्जा नियामक मंडळा (एईआरबी)ने ठरवून दिलेल्या मापदंडकाच्या मर्यादेत असल्याचे अणुऊर्जा केंद्र प्रशासनाने सांगितले होते. त्या वेळी अणुभट्टी क्र.-४ च्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम मे महिनाअखेरपर्यंत पूर्ण होऊन, अणुभट्टीतून वीजनिर्मिती सुरू होईल, असे सांगितले होते. मात्र, ५४ दिवस उलटूनही अणुभट्टी क्र.-४ मधील बिघाडासंदर्भात गुप्तता पाळण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तारापूर परिसरात संभ्रमाचे वातावरण आहे. त्याच वेळी अणुभट्टी क्रमांक-३ चेही काही दिवसांपूर्वी शटडाउन घेतल्याने, ५४० मेगावॅट क्षमतेच्या दोन्ही अणुभट्ट्यांतून होणारी वीजनिर्मिती ठप्प झाल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
तारापूर अणुभट्टी-४ दोन महिन्यांपासून बंद
By admin | Published: July 17, 2017 2:47 AM