अजित मांडके / ठाणेठाणे महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता पुन्हा महापौर हा शिवसेनेचाच बसणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यातही आता त्यांना कुणाच्याही कुबड्यांची गरज भासणार नसल्याने खऱ्या अर्थाने महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. यामध्ये परिषा सरनाईक, मीनाक्षी शिंदे, उषा भोईर, नंदिनी विचारे आणि जयश्री फाटक यांची नावे चर्चेत आहेत.ठाणे महापालिकेच्या या निवडणुकीत शिवसेनेला ६७ जागा मिळाल्या असून त्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपाला २३ जागा मिळाल्या आहेत. परंतु, यंदा मात्र भाजपाला सत्तेची चव चाखण्यास मिळणार नाही. हेदेखील या निकालाने स्पष्ट केले आहे. मॅजिक फिगर ६६ असल्याने शिवसेनेकडेच महापौरपदही राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार, येत्या ६ मार्च रोजी महापौरपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी २ मार्चला नामनिर्देशनपत्र भरायचे आहे. निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी राष्ट्रवादी सकाळी जे मुद्दे शिवसेनेच्या विरोधात बोलत होती, तेच मुद्दे भाजपाकडून आपल्या भाषणात घेतले गेले होते. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजपा आणि राष्ट्रवादी अशी युती होईल आणि ठाण्यात या दोघांकडून सत्तेची गणिते जुळवली जातील, असे वाटत होते. परंतु, राष्ट्रवादी पुन्हा ३४ वर अडकून राहिली असून एक अपक्ष हा राष्ट्रवादी पुरस्कृत आहे. भाजपा अडीच पटीने वाढली असली तरी त्यांचा आकडा २३ च्या पुढे गेला नाही. त्यातही काँग्रेसला केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. तर, एमआयएम दोन जागांवर जिंकली असून अन्य एक अपक्ष राष्ट्रवादीत सामील होईल, अशी शक्यता पकडली तरीसुद्धा या सर्वांचे संख्याबळ हे ६४ च्या घरात जात आहे. परंतु, एमआयएम राष्ट्रवादीबरोबर जाईल, ही शक्यता धूसरच आहे. त्यामुळेच आता महापौर हा शिवसेनेचाच होणार, हे स्पष्ट आहे. ठाण्याचे महापौरपद हे महिलेसाठी आरक्षित असल्याने महिलांनी किंबहुना त्यांच्या पती महाराजांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी देवराम भोईर यांना महापौरपदाचे गाजर देण्यात आले होते. परंतु, महिला महापौर होणार असल्याने आता त्यांची सून उषा भोईर यांचे नाव आघाडीवर येत आहे. या यादीतून महेश्वरी तरे यांचे नाव त्या पराभूत झाल्याने कमी झाले असून एच.एस. पाटील यांच्यासह त्यांच्या सुनेचाही पराभव झाल्याने कल्पना पाटील यांचा कितपत टिकाव लागेल, हेदेखील कठीण आहे.
महापौरपदासाठी रस्सीखेच
By admin | Published: February 24, 2017 7:26 AM