ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 8 - शहरातील विविध पोलीस ठाण्यांत कार्यरत असलेल्या सात पोलीस हवालदारांबाबत तक्रारी प्राप्त होताच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्या पोलिसांच्या तडकाफडकी मुख्यालयात बदल्या केल्या. अचानक झालेल्या बदल्यांमुळे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. शहरातील अवैध धंदे बंद व्हावे, यासाठी पोलीस आयुक्त प्रयत्न करीत आहेत. असे असताना विविध ठाण्यांच्या हद्दीत कोठे ना कोठे अवैध दारूविक्री, पत्त्याचे अड्डे सुरूच असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना त्यांच्या खबऱ्यांकडून प्राप्त होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या वतीने या अड्ड्यांवर कारवाई केली जाते. या कारवाईनंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी अवैध धंदा सुरू होतो. संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना याबाबत सक्त आदेश दिलेले असताना असे धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, याबाबतची माहिती काढण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी आपल्या काही माणसांना दिली. तेव्हा विविध ठाण्यांत कार्यरत असलेले आणि पोलीस निरीक्षकाचे खास म्हणून वावरणारे हवालदार या लोकांच्या मागे असल्याची माहिती मिळाली. या हवालदारांविरोधात तोंडी स्वरूपात अनेक लोकांच्या तक्रारी पोलीस आयुक्तांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्यांनी दोन दिवसांपूर्वी एमआयडीसी वाळूजचे हवालदार म्हस्के, सातारा ठाण्यातील हवालदार गिरी, छावणी ठाण्यातील हवालदार तेजीनकर, दौलताबाद ठाण्यातील पोहेकॉ. सानप आणि ढगे, सिडको ठाण्यातील हवालदार पंडित यांना मुख्यालयात हलविले.