मुंबई : केंद्रीय वीज लवादाने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या टाटा पॉवरच्या वीज दर निश्चितीला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता टाटा पॉवरचे वीज दर २५ ते ३० टक्क्यांनी कमी होणार होणार असून, या स्वस्त विजेचा सुमारे ७ लाख ग्राहकांना फायदा होईल, असा दावा टाटा पॉवरने केला आहे. दरम्यान, ही अंतरिम स्थगिती जुलै महिन्यापासूनच लागू झाली असून, ऑगस्ट महिन्यात येणारी वीज बिले कमी दराने येणार आहेत.
टाटा पॉवरने २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे पंचवार्षिक वीज दर निश्चितीसाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार टाटा पॉवरचे वीज दर निश्चित होत होते. मात्र, २३-२४ मध्ये आयोगाने निश्चित केलेल्या वीज दराबाबत टाटा पॉवर समाधानी नव्हते. आम्ही दाखल केलेल्या प्रस्तावाच्या तुलनेत अधिकचे वीज दर निश्चित झाले होते, असे टाटा पॉवरकडून सांगण्यात आले. परिणामी वीज ग्राहकांवर विजेचा अधिक बोजा येऊ नये म्हणून टाटा पॉवरने केंद्रीय वीज लवादाकडे धाव घेतली होती. टाटा पॉवरच्या दाखल याचिकेवर लवादाने निर्णय देताना महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या वीज दर निश्चितीला अंतरिम स्थगिती दिली आहे.
लवादाच्या या स्थगितीमुळे आता विजेचे दर सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी कमी होणार आहेत. टाटा पॉवरने वीज नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीज दर निश्चितीच्या प्रस्तावानंतर सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांचे दर सरासरी १५ टक्क्यांनी वाढले होते. मात्र आता या वीज दर निश्चितीला स्थगिती मिळत वीज दर २५ ते ३० टक्क्यांनी खाली येणार असल्याने वीज ग्राहकांना १० टक्क्यांनी दिलासा मिळेल, अशी माहिती टाटा पॉवरचे डिस्ट्रिब्युशन विभागाचे (मुंबई ऑपरेशन्स) प्रमुख डॉ नीलेश काणे यांनी दिली.