अतुल कुलकर्णी, मुंबईकॅन्सर सारख्या दुर्धर आजारावरील उपचारासाठी चांगले डॉक्टर्स तयार व्हावेत यासाठी मुंबईच्या टाटा स्मारक रुग्णालयाने पुढाकार घेतला असून १२० डॉक्टरांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सेमिनार मंगळवारपासून सुरु होत असून एकूण १२० डॉक्टर्समधून निवडलेल्या ५ डॉक्टरांना लंडनला चार आठवड्यासाठी विशेष अभ्यासासाठी पाठवले जाणार आहे. या उपक्रमाचा खर्च रतन टाटा ट्रस्ट आणि मुंबईच्या टाटा स्मारक रुग्णालयाच्या वतीने केला जाणार आहे. या सेमिनारसाठी लंडनच्या किंग्ज कॉलेज आणि गॉईज हॉस्पीटलच्या आठ डॉक्टरांचे विशेष पथक मुंबईत दाखल झाले आहे.कॅन्सरचे प्रमाण उत्तरांचल भागात जास्त आहे; मात्र त्या ठिकाणी कॅन्सरवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्या भागातील १६ डॉक्टराची निवड या सेमिनारसाठी करण्यात आली आहे. या उपक्रमाबद्दल लोकमतशी बोलताना टाटा मेमोरियल सेंटरचे डायरेक्टर डॉ. कैलास शर्मा म्हणाले, कॅन्सरचा अभ्यास करण्यासाठी व त्यात तज्ज्ञ डॉक्टर होण्यासाठी आयुष्यातील किमान ८ ते ९ वर्षे द्यावी लागतात. या काळात विद्यार्थ्यांना ज्ञान मिळायला हवे, त्यांचे कौशल्य वाढावे आणि कल स्पष्ट व्हावे यासाठी हे सेमिनार मोलाचे ठरणार आहे. यासाठी राज्यासह विविध ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाचे आणि एमडीएमएसच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची त्या त्या ठिकाणी परिक्षा घेण्यात आली. त्यानंतर त्यांना या सेमिनारला येण्याचा त्यांचा हेतू काय? यावर एक पेपर लिहायला सांगितला गेला. त्यानंतरच १२० विद्यार्थ्यांची निवड केली गेली. गेल्यावर्षी यासाठी ५० विद्यार्थी निवडले होते. हे या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे.या १२० विद्यार्थ्यांना ५० तज्ज्ञ प्राध्यापक आणि लंडनहून आलेल्या ८ तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दोन आठवडे मार्गदर्शन करेल. त्यातील सर्वाेत्कृष्ट पाच विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना पुढील अभ्यासासाठी चार आठवड्यासाठी लंडनला पाठविण्यात येणार आहे.
कॅन्सर तज्ज्ञ घडविण्यासाठी ‘टाटा’चा पुढाकार
By admin | Published: May 10, 2016 3:48 AM