मुंबई : महावितरण, रिलायन्स आणि बेस्टनंतर आता टाटा पॉवरनेही महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे २०१६-१७ सालासाठी ६ टक्के वीजदरवाढीची याचिका दाखल केली आहे. आयोगाने प्रस्तावित दरवाढीला मान्यता दिली तर टाटाच्या ग्राहकांना मोठा भुर्दंड बसणार आहे. टाटाने आयोगाकडे १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या थेट ग्राहकांसाठी ४ रुपये ९ पैसे, ३०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांसाठी ६ रुपये ८३ पैसे आणि ५०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांसाठी ९ रुपये ३५ पैसे अशी वीजदरवाढीची याचिका दाखल केली आहे. तर चेंज ओव्हर ग्राहकांसाठी म्हणजे रिलायन्सकडून टाटाकडे वळलेल्यांपैकी १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी १ रुपये ९१ पैसे, ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ४ रुपये ४६ पैसे आणि ५०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ६ रुपये ७५ पैसे एवढ्या वीज दरवाढीची याचिका कंपनीतर्फे दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, सार्वजनिक सेवांचा विचार करता सरकारी, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांसाठी थेट ग्राहकांसाठी १० टक्के दरवाढीचा प्रस्ताव आहे.रिलायन्स, महावितरणचे आधीपासून प्रस्तावरिलायन्स इन्फ्राने यापूर्वीच घरगुती वीज ग्राहकांसाठी २ ते १० टक्के वीजदरवाढीची याचिका दाखल केली आहे. याचिकेत रिलायन्सने दरमहा शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी १० टक्के वीजदरवाढ प्रस्तावित केली आहे. १०१-३०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांसाठी ८ टक्के, ३०१-५०० युनिटपर्यंतच्या वीजग्राहकांसाठी ४ टक्के आणि ५०० युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या वीज ग्राहकांसाठी २ टक्के वीजदरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. तर राज्यात वीज पुरवणाऱ्या महावितरणनेही यापूर्वीच ५.५० टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे सादर केला आहे.
वीजदरवाढीसाठी ‘टाटा’ची याचिका
By admin | Published: April 30, 2016 4:42 AM