वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे हे पुणे मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आज मोरे यांना निवडणूक चिन्ह जाहीर करण्यात आले. वसंत मोरे यांना रोड रोलर हे चिन्ह देण्यात आले आहे. हातोडावाले तात्या म्हणून फेमस असणारे मोरे पुण्यात रोडरोलर घेऊन फिरणार आहेत.
वसंत मोरे यांनीच रोड रोलर हे चिन्ह मिळाल्याचे जाहीर केले आहे. पुण्यात आता वसंत (तात्या) मोरे यांचा विकासाचा रोडरोलर प्रस्थापितांची झोप उडवणार, असे ट्विट करत मोरे यांनी फोटो शेअर केला आहे. वसंत मोरे यांना आता काँग्रेसचा हात आणि भाजपाचे कमळ या चिन्ह आणि रविंद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ या उमेदवारांविरोधात लढायचे आहे. विशेष म्हणजे तिघेही एकाचवेळी पुणे पालिकेमध्ये नगरसेवक होते. तेच आता लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे पुण्यातील उमेदवार वसंत मोरे यांच्याकडे अनेक गाड्या, सोने आणि चांदी अशी मालमत्ता असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. त्यांच्याकडे चार कोटी १६ लाख ६७ हजार ३६४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर मोरे यांच्यावर तीन कोटी ४९ लाख २३ हजार ४३९ रुपयांचे, पत्नीवर ८ लाख ८९ हजारांचे आणि मुलगा रुपेश मोरेवर ४७ हजार १४७ रुपयांचे कर्ज आहे. वसंत मोरेंचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून त्यांच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे इनोव्हा, ऑडी आणि ॲम्बेसिडर या चारचाकी गाड्यांचा ताफा; बुलेटसह सहा दुचाकी आणि एक ट्रक आहे. सोबतच त्यांच्याकडे ७० ग्रॅम आणि पत्नीकडे २७० ग्रॅम सोने आहे.