सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत शनिवारी मध्यरात्री धडकलेल्या ‘तौक्ते’ वादळाने मुसळधार पावसासह धुमाकूळ घातला. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने समुद्र खवळला असून, नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. रात्रीपासून वादळी वाऱ्याने दोन्ही जिल्ह्यांत ठिकठिकाणी झाडे कोसळून पडली, तर घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कणकवलीसह कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यात वाऱ्याने प्रचंड नुकसान झाले असून, सर्वाधिक फटका वैभववाडी तालुक्याला बसला आहे. सावंतवाडी तालुक्यात ठिकठिकाणी घरांवर झाडे कोसळली असून, अनेक मुख्य मार्गांवरही झाडे पडल्याने मार्ग बंद झाले आहेत. आंबोली घाटमार्गावर दरड, तसेच झाडे कोसळण्याचे प्रकारही सुरू आहेत. वैभववाडी तालुक्यात १०० हून अधिक इमारतींचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील समुद्र किनारपट्टीला वादळाचा जाेरदार तडाखा बसला. किनारपट्टीतील आंबाेळगड, मुसाकाझी, आवळीचीवाडी या भागातील कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे, तर रत्नागिरी तालुक्यात सायंकाळी अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रविवारी दिवसभर वादळी वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडे पडली.
कोल्हापुरात जोरदार वारे, पावसाने झोडपलेकोल्हापुरात जोरदार वारे आणि पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. वाहतूक खोळंबली, वीजप्रवाहदेखील खंडित झाला. दुपारनंतर संततधार पावसाने झोडपून काढले. सांगली, मिरज शहर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडून विद्युत तारांचे व घरांचेही नुकसान झाले.
पश्चिम वऱ्हाडात वाऱ्यासह पाऊसपश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. ग्रामीण भागामध्ये घरांवरील टिनपत्रे उडाली. झाडे कोसळली व वीज पुरवठा खंडित झाला. वर्धा शहरासह सेवाग्राम, पवनार, समुद्रपूर, सेलू, घोराड, सिंदी रेल्वे भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
पुणे शहरात ४० झाडे कोसळलीपुणे शहरात सायंकाळी सात वाजेपर्यंत वेगवान वाऱ्यामुळे ४० झाडे पडली. बारामती येथे महावितरणचे खांब कोसळल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला, तर खेड तालुक्यात ८७ घरांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या.