अशोक चव्हाणांना विधानसभा न लढविण्याचा सल्ला देणारे तावडे उमेदवारीच्या शोधात !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 02:58 PM2019-10-02T14:58:47+5:302019-10-02T15:48:57+5:30
लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार असून,चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये असे तावडे म्हणाले होते.
मुंबई - माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवू नये असा उपरोधिक सल्ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लगावला होता. त्यावेळी चव्हाण यांनी तावडेंना सल्ले न देता आपल्या पक्षात काय सुरू आहे, ते पाहावे असं सांगितले होते. आता त्याच तावडेंना उमेदवारीची भ्रांत आहे.
भारतीय जनता पक्षाची पहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये मंत्री तावडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव नाही. एवढच काय तर तावडे यांची उमेदवारी कापण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तावडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे तावडेंची उमेदवारी धोक्यात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये, या सल्ल्यानंतर चव्हाणांनी तावडे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. तावडे यांनी फुकटचे सल्ले देऊ नयेत त्यांनी आपल्या पक्षातील बंडखोरीकडे लक्ष द्यावे असा प्रतीसल्ला सुद्धा चव्हाण यांनी तावडे यांना दिला. मात्र आता तावडे यांच्याच उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार असून,चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नयेत असे तावडे म्हणाले होते.