मुंबई : आग लागल्याशिवाय धूर निघत नाही, असा टोला हाणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनसे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी काढलेल्या पत्रकात तावडे आणि मुंडे या मंत्रीद्वयांच्या चौकशीची मागणी केली आहे. तावडे आणि मुंडे यांनी चौकशीला सामोरे जावे आणि निर्दोष असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ म्हणवून घेणारा भाजपाही मागील सरकारप्रमाणे वागताना दिसत आहे. १४ वर्षे सत्तेबाहेर राहिल्यामुळे यांची ‘भूक‘ वाढली आहे का, असा प्रश्न उपस्थित करतानाच युती सरकारसुद्धा आघाडी सरकारचीच धोरणे आणि दरकरार पुढे रेटताना दिसत आहे, असा आरोप मनसेने केला आहे. तावडे आणि मुंडे यांच्यावरील आरोपामागील सत्य जनतेसमोर यायलाच हवे. सरकारने तावडे आणि मुंडे या दोघांची चौकशी करावी. या चौकशीच्या काळात दोघांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आपण आघाडी सरकारपेक्षा वेगळे आहोत, हे जनतेला दाखवून द्यावे असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
तावडे आणि मुंडेंचे राजीनामे घ्या
By admin | Published: July 02, 2015 12:41 AM