मुंबई : शिक्षणमंत्री विनोद तावडे व महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे हे भविष्यातील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते हे सत्य स्वीकारले तर त्यांच्या ‘भानगडी’ बाहेर काढून दोघांनाही आताच जेरबंद करण्याचे राजकारण नक्कीच खेळले गेले आहे, असा स्पष्ट निष्कर्ष शिवसेनेच्या मुखपत्रात काढण्यात आला असून हे दोघे भाजपांतर्गत राजकारणाचेबळी असल्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.गेल्या काही दिवसांत केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांवर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा समाचार शिवसेनेच्या मुखपत्रात घेण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री दमू नका’ या अग्रलेखात म्हटले आहे की, बबनराव लोणीकर व विनोद तावडे यांच्या पदव्यांचा वाद विरोधकांना एखाद्या अस्वलाप्रमाणे गुदगुल्या करीत आहे. मुळात ही पदवी प्रकरणे बाहेर काढली कोणी? अमूकतमुक मंत्र्याच्या पदव्या बनावट आहेत हे बाहेरच्यांना कसे समजले? म्हणजे ही नाजूक आणि गोपनीय बाब चव्हाट्यावर आणून मंत्र्यांना अडचणीत आणणारे त्यांचेच निकटवर्तीय असले पाहिजेत.पंकजा मुंडे यांचे चिक्कीचे प्रकरण समोर आले. कोणत्याही निविदा वगैरे न मागवता साधारण दोन-अडीचशे कोटींचा हा व्यवहार झाला व पंकजाताई अडचणीत आल्या. पंकजा यांच्या पाठीशी समाज आणि पिताश्रींची पुण्याई आहे व त्यांना चांगला पाठिंबा मिळू शकतो हे लक्षात आल्यावर चिक्की खरेदी प्रकरणात विष मिसळले गेले, असे शिवसेनेच्या मुखपत्रात म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)नैतिकता व साधनशुचिता हाच संघ परिवाराचा प्राण आहे. त्यामुळे भाजपा सतत नैतिकता, सदसदविवेकबुद्धी, साधनशुचिता, स्वच्छ आणि पारदर्शक कारभार या शब्दांवर अजिबात गंज चढू देत नाही. हे शब्द घासूनपुसून चकचकीत ठेवण्याकरिता ही मंडळी पराकाष्ठा करीत असली तरी दिल्लीत आणि महाराष्ट्रातही याच शब्दांची खाजकुजली त्यांच्या सर्वांगावर पडली आहे, असा टोला शिवसेनेने संघ व भाजपाला लगावला आहे.
तावडे-मुंडेंना ‘जेरबंद’ करण्याची भाजपाची खेळी!
By admin | Published: June 28, 2015 2:20 AM