मुंबई : राज्यात कर आणि करेतर महसुलाची तब्बल ६२ हजार ९०७ कोटी रुपयांची थकबाकी असून ८३ हजार प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगत या विषयी श्वेतपत्रिका विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काढली जाईल, असे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बाबत प्रश्न विचारला होता. विखे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रचंड थकबाकीबद्दल चिंता व्यक्त करताना त्याची वसुली कशी करणार, असा सवाल केला. मुनगंटीवार म्हणाल, राज्य सरकारचा ६२ हजार ९०७ कोटींचा कर महसूलाची वसूली विविध कारणांनी थकीत आहे. गेल्या १०-१२ वर्षातील ही करथकबाकी असून ती वसूली करण्याचे प्रयत्न सुरु असल्यानंतरही ही थकबाकी वसूल झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. ४ हजार ५२० कोटींची थकबाकी वसूली करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. श्वेतपत्रिका काढायला माझी हरकत नाही पण थकबाकी असलेल्या काही संस्थांमध्ये आपले सदस्यही असण्याची शक्यता आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. मात्र, श्वेतपत्रिका काढाच अशी आग्रही भूमिका विखे पाटील, अजित पवार आदींनी घेतली आणि मुनगंटीवार यांनी तशी घोषणा केली. (विशेष प्रतिनिधी)>मी बोलू की नाही?ही थकबाकी केवळ माझ्या नव्हे तर इतर विभागांशीही संबंधित आहे. एका खात्याचे मंत्री दुसऱ्या खात्याविषयी उत्तर देऊ शकत नाहीत असे निर्देश अध्यक्षांनी कालच दिलेले होते. मग आता मी बोलू की नाही, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. तथापि, ते कालबाबत होते; आज तुम्ही उत्तर द्या, असे सांगत अध्यक्षांनी वातावरण निवळण्यास मदत केली.
राज्यात ६२ हजार ९०७ कोटींची कर थकबाकी
By admin | Published: July 22, 2016 4:10 AM