मुंबई : परराज्यात आलिशान गाड्यांची नोंदणी करून कर चुकवणाऱ्या आणि नंतर महाराष्ट्रात यातही खासकरून मुंबईत वाहन चालवणाऱ्या कार मालकांवर आरटीओकडून जानेवारी महिन्यापासून धडक कारवाई केली जात आहे. अशीच कारवाई सिक्कीममध्ये नोंदणी झालेल्या आणि मुंबईत धावत असलेल्या एका आलिशान कारवर करण्यात आली. वाहन कर चुकवल्यामुळे तब्बल २९ लाख रुपयांचा कर वाहन मालकाला भरावा लागणार आहे. महाराष्ट्र सोडता काही राज्यांत वाहन कर हा जवळपास ५ टक्के आहे, तर महाराष्ट्रात हाच कर जवळपास २० टक्के एवढा आहे. त्यामुळे कमी कर असणाऱ्या राज्यात वाहन नोंदणी केल्यानंतर, कर चुकवून ही वाहने महाराष्ट्रात चालवली जातात. अशा वाहनांविरोधात राज्याच्या परिवहन विभागाकडून कारवाई केली जाते. १८ जानेवारीपासून परिवहन विभागाकडून महाराष्ट्राबाहेर नोंदणी करणाऱ्या आणि कर चुकवणाऱ्या वाहनांविरोधात कारवाईस सुरुवात करण्यात आली. पहिल्या दहा दिवसांत २०० आलिशान वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कारवाईचा वेग आणखी वाढवण्यात आला. विमानतळ, हॉटेल येथे उभ्या असणाऱ्या आलिशान वाहनांवरही कारवाईला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत राज्यात एकूण ४११ आलिशान वाहने पकडण्यात आली असून यात मुंबईतील ९० टक्के वाहनांचा समावेश आहे. मुंबईत दोन दिवसांपूर्वी जुहू येथे रेंज रोवर ही आलिशान गाडी पकडण्यात आली. सिक्कीममध्ये नोंदणी केलेल्या या कारची किंमत १ कोटी २१ लाखांपेक्षाही अधिक आहे. मात्र मुंबईत धावत असलेली ही कार अंधेरी आरटीओकडून पकडण्यात आली आणि त्याची कागदपत्रे तपासली असता नोंदणी परराज्यात झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वाहनाच्या किमतीनुसार जवळपास २९ लाख ५६ हजार २३0 रुपयांचा कर भरण्यास कार मालकाला सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
कर चुकवेगिरी पडली ‘२९ लाखांना’
By admin | Published: February 16, 2017 5:08 AM