शेतक-यांच्या विहिरितल्या पाण्यावर टॅक्स लावणा-या मोदी, फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्स लावा - खा. अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 03:27 PM2018-09-01T15:27:25+5:302018-09-01T15:27:37+5:30
शेतक-यांच्या विहिरीतल्या पाण्यावर टॅक्स लावणा-या मोदी फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्स लावला पाहिजे
कोल्हापूर - शेतक-यांच्या विहिरीतल्या पाण्यावर टॅक्स लावणा-या मोदी फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्स लावला पाहिजे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा आज दुस-या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक येथे पोहोचली. त्यानंतर चोकाक येथे आयोजीत सभेत खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, " राज्यातले आणि केंद्रातले भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात शेतक-यांना शेतीसाठी लागणा-या ट्रॅक्टरवरच्या सुट्या भागांवर आणि इतर शेती औजारांवर जीएसटी लावणा-या या सरकारने आता शेतक-यांच्या विहिरीतल्या पाण्यावर टॅक्स लावला आहे. खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करणा-या मोदी फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्स लावला पाहिजे."
"काँग्रेस सरकारच्या काळात विकासात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची भाजप शिवसेना सरकारने अधोगती केली आहे. शेतीमालाला भाव नाही. कर्जमाफी मिळाली नाही. शेतक-यांना पीक कर्ज मिळत नाही. नुकसानीची मदत मिळत नाही. जनतेला मदत कऱण्याऐवजी सरकार इंधनावर कर लावून सर्वसामान्यांची लूट करित आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे या भागातील पॉवरलूम व्यवसाय अडचणीत आला आहे. हजारो लोकांचा रोजगार गेला आहे. भाजप शिवसेना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वच घटक अडचणीत आले आहेत. राज्यावर पाच लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. भाजप शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही त्यामुळे ते प्रश्न सोडवू शकत नाहीत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही." असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.