नागपूर : शेतकऱ्यांना प्रतिलीटर ५ रुपये देण्यासोबतच परप्रांतातील दुधावर कर लावा, ब्रँडची संख्या कमी करा, भेसळ व कृत्रिम दुधाला पूर्ण रोखा, असे आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दुधउत्पादकांच्या आंदोलनाबाबत ९७ अन्वये चर्चेत बोलताना सांगितले. यावेळी नीलम गो-हे म्हणाल्या, १९६५ ला प्रतिदिन १ लाख लीटरची उलाढाल होती, आता ती २१ कोटी लीटरवर पोहोचली आहे. दूध उत्पादन कल्याणकारी संघ, अहमदनगर - वडगाव आमली ता पारनेर जि नगर यांचे वतीने गुलाबराव डेरे यांनी मला निवेदन दिले आहे, त्यातून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या बऱ्याच प्रश्नावर प्रकाश पडतो आहे.४० टक्के वाटा सहकार पक्षाचा, ६० टक्के खाजगी क्षेत्राचा वाटा आहे. दुधाचे ब्रँड कमी करून एक ब्रँड शासन, सहकाराचा व दुसरा खाजगी ब्रँड ठेवावा जेणेकरुन ग्राहकांची व शेतकऱ्यांची लूट थांबेल. गावोगावची दुधसंकलन केंद्रे बंद पडली आहेत. गावागावात खाजगी संख्या दुधाचा दर्जा सांभाळतातच असे नाही त्याचसोबत दुधभेसळ प्रतिबंधक उपाय गरजेचे आहेत. तसेच, परराज्यातील दुधावर कर लावण्यात यावा. त्याचवेळी टोन्ड दूध बंद करून गायीचे दूध हा खास ब्रँड प्रोत्साहित करावा, असेही नीलम गो-हे यांनी सांगितले. शेतकरी कष्ट करतात पण त्यांच्या घरातील महिला शक्ती अहोरात्र राबत असते. आज त्यांच्या कष्टाचे किमान वेतन मोजले तर दुधाच्या उत्पादनाचा खर्च कितीतरी पटीने अधिक गृहीत धरावा लागेल. स्त्रियांच्या कष्टाचे मोल मोजून ही प्रतिलीटर ५ रु थेट मदत तुटपुंजी आहे. सरकारने दुधसंघांना सक्षम करायचा प्रयत्न करावा व शेतकऱ्यांना सक्षम होतील असे धोरण राबवावे, असेही यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
परप्रांतातील दुधावर कर लावा आणि भेसळ, कृत्रिम दुधाला रोखा - नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 7:13 PM