लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावरील कूल कॅब आणि काळीपिवळी टॅक्सींसाठी असणाऱ्या पार्किंगच्या जागेत केलेली कपात आणि जीव्हीके कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात, विमानतळावरील सुमारे १८०० टॅक्सीचालकांनी शुक्रवारी अचानक संप पुकारला. टॅक्सीचालकांनी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने, प्रवाशांची काही काळ मोठी गैरसोय झाली. मुंबई विमानतळ परिसरात सुमारे सहा हजार कूल कॅब आणि काळीपिवळी टॅक्सींचा राबता असतो. त्या तुलनेत टॅक्सीच्या पार्किंग लेनची संख्या मात्र अपुरी आहे. पूर्वी टॅक्सी पार्किंगसाठी एकूण ४५ लेनची व्यवस्था होती. ती काही दिवसांपूर्वी ३६ वर आणण्यात आली. आधीच अपुऱ्या लेन असताना, जीव्हीकेने त्यात कपात आली. आता ३६ वरूनही लेनची संख्या कमी करण्याचा जीव्हीकेचा प्रयत्न असून, टॅक्सींसाठी केवळ २९ लेन चालू ठेवण्याचा निर्णय जीव्हीकेने घेतला. त्या विरोधात टॅक्सीचालकांनी आज दुपारी संपाचे संपाचे हत्यार उपसले.
आणखी लेनची आवश्यकतामुंबई विमानतळावर टॅक्सी लेनची संख्या अपुरी असताना, त्यात आणखी कपात करण्याचे धोरण जीव्हीकेने स्वीकारले आहे. आंतराष्ट्रीय विमानतळावर ये-जा करणारे बहुतांश विमानप्रवासी खासगी वाहनांपेक्षा टॅक्सीला पसंती देतात. ही परिस्थिती लक्षात घेता, टॅक्सींसाठी आणखी लेनची आवश्यकता असताना, जीव्हीकेकडून त्यात कपात करण्यात येत आहे. टॅक्सी लेन हटवून त्या जागी गोदाम उभारण्याची जीव्हीकेची योजना असल्याचा आरोप, माजी आमदार आणि भाजपाचे मुंबई उपाध्यक्ष कृष्णा हेगडे यांनी केला. विमानतळावरील सुमारे १८०० टॅक्सीचालकांनी शुक्रवारी अचानक संप पुकारल्याने, काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी हस्तक्षेप करत, टॅक्सीचालकांशी चर्चा केली.आठवडाभरात निर्णयटॅक्सीचालकांच्या मागण्यांबाबत जीव्हीकेने विचार करावा, कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना पोलिसांनी जीव्हीकेला केली. जीव्हीके प्रशासनानेही टॅक्सीचालकांच्या मागण्यांसदर्भात एका आठवड्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर टॅक्सी चालकांनी आपला संप मागे घेतण्याची घोषणा केली.