मुंबई : ओला, उबरसह अॅग्रीगेट सेवा देणाऱ्या टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत, या मागणीसाठी २९ आॅगस्टपासून टॅक्सी-रिक्षांचा बेमुदत संप पुकारण्यात आला होता. मात्र, या संपातून टॅक्सी संघटनांनी पुन्हा माघार घेतली. १ सप्टेंबरला मुख्यमंत्री व परिवहनमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन मिळाल्यानंतर जय भगवान महासंघ व स्वाभिमान टॅक्सी संघटनांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेतल्याची घोषणा केली. ओला, उबर टॅक्सींमुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांचा रोजगार बुडत आहे. सरकारने तर या कंपन्यांना खुली सूटच दिली आहे. त्यामुळे ओला, उबरसारख्या खासगी सेवांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी करत नव्यानेच आलेल्या जय भगवान महासंघातर्फे २१ जून रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले आणि त्याला हिंसक वळणही लागले होते. त्यानंतर, चर्चेत आलेल्या या महासंघातर्फे २६ जुलै रोजी संपाची हाक दिली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन देताच संप मागे घेण्यात आला होता. त्यानंतर, पुन्हा महासंघाकडून २९ आॅगस्ट रोजी बेमुदत टॅक्सी-रिक्षा संपाची हाक दिली आणि त्यात स्वाभिमान टॅक्सी संघटनाही उतरली. या संदर्भात रविवारी (२८ आॅगस्ट) परिवहन आयुक्तालयातही टॅक्सी संघटनांची बैठक झाली. या बैठकीवर स्वाभिमानकडून बहिष्कार टाकण्यात आला आणि तर बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर फक्त आश्वासनच मिळाल्याने, जय भगवान महासंघाने संपाची भूमिका घेतली होती. मात्र, संध्याकाळी या दोन्ही संघटनांकडून बेमुदत पुकारलेला संप मागे घेण्यात आल्याची घोषणा केली. परिवहनमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेत असल्याचे जय भगवान व स्वाभिमानकडून स्पष्ट करण्यात आले. १ सप्टेंबर रोजी परिवहनमंत्र्यांसोबत बैठक बोलाविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
टॅक्सी-रिक्षांचा संप अखेर मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2016 5:49 AM