ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - राज्यातील अन्य भागांच्या तुलनेत मुंबईकडे विकसित आणि सुशिक्षितांचे शहर म्हणून पाहिले जाते. पण मुंबईतील मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकली तर बिलकुल उलट चित्र दिसेल. विविध प्रश्नांवर मुंबईकर सर्वाधिक जागरुक असले तरी, याच जागरुकतेचे प्रतिबिंब मतदानात उमटत नाही.
गेल्या महापालिका निवडणुकीत मुंबईत 44 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कॉर्पोरेटस, बिझनेस ग्रुप, विद्यार्थी आणि विविध सरकारी संस्था आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत. मुंबईकरांनी मतदानात उत्साहाने सहभागी व्हावे यासाठी Discount चे आमिष दाखवले जात आहे.
मुंबईकरांना खासगी टॅक्सी सेवा देणा-या कंपन्यांनी 21 फेब्रुवारीला मतदानाच्या दिवशी सवलत देण्याची तयारी दाखवली आहे. हॉटेल व्यावसायिकांची संघटना असणा-या 'आहार'ने सुद्धा आपल्या सदस्यांना पत्र लिहून मतदानाच्या दिवशी मतदान करुन येणा-या ग्राहकांना सवलत देण्याचे आव्हान केले आहे. त्यामुळे मुंबईतील काही हॉटेल्समध्ये मतदानाच्या दिवशी 5 ते 10 टक्के Discount मिळू शकते. लोकशाहीप्रती आपली जबाबदारी ओळखून सध्या मुंबईतील काही हॉटेल्सच्या प्रवेशव्दारावर 21 फेब्रुवारीला मतदान करण्याचे बॅनर्स लागले आहेत.