नितीन जगताप, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेल्वे प्रवासाच्या चार तास आधी ‘चार्ट’ तयार होतो. त्यानंतर आरक्षित तिकीट दिले जात नाही. मात्र, दुसरीकडे एखादे तिकीट रद्द झाले किंवा प्रवासी आले नाही तर अनेकदा ती रिकामी जागा देताना टीसी मनमानी करतात. मात्र, आता टीसीची मर्जी नाही तर ‘हॅन्ड हेल्ड टर्मिनल’ आपली कमाल दाखवणार आहे. मुंबई विभागाला २२४ हॅन्ड हेल्ड टर्मिनल मिळाले असून, ११२ गाड्यांमध्ये ‘चार्ट’ बनल्यानंतर देखील प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळण्याची सोय झाली आहे.
मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई रेल्वे विभागाने रेल्वे बोर्डकडे एचएचटीची मागणी केली होती. मुंबई विभागाला २२४ एचएचटी उपकरणे मिळाली असून, २१९ उपकरणांचे कर्मचाऱ्यांना त्याचे वाटप करण्यात आले आहे. मुंबई विभागाने २२४ सिमकार्डची खरेदी केली आहे. याचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून, आतापर्यंत ११५ जणांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत सगळ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल. सध्या ६ गाड्यांच्या जोड्यांमध्ये या उपकरणाचा वापर सुरू आहे. आम्ही इतर गाड्यांमध्ये एचएचटी उपकरण वापरण्याची तयारी सुरू केली असून, मुंबई विभागातून चालविण्यात येणाऱ्या ११२ गाड्यांमध्ये वापर केला जावा, अशी मागणी मुख्यालयाकडे केल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मुंबई विभागाला २२४ हॅन्ड हेल्ड टर्मिनल मिळाले असून, ११२ गाड्यांमध्ये चार्ट बनल्यानंतर देखील प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
ही यंत्रणा असे करेल काम
एचएचटी हे उपकरण रेल्वे आरक्षण केंद्रावरील प्रणालीच्या सर्व्हरशी जोडले असेल. यासाठी यात ‘फोर जी’ चे सिम असेल. एखादी गाडी रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर दोन स्टेशन गेल्यावर सुद्धा एखाद्या सीटवर प्रवासी नसेल तर तो प्रवासी प्रवासास अनुपस्थित असल्याचे समजले जाईल, गाडीतील टीसी त्याची माहिती एचएचटीवर देतील. त्याची नोंद आरक्षण प्रणालीत होईल. त्यामुळे पुढच्या स्थानकावरील प्रवाशांना त्याची माहिती मिळेल. याद्वारे आरक्षित सोपे होईल.
टीसीच्या मनमानीला बसणार चाप
रेल्वेने सुरू केलेली सुविधा प्रवाशांच्या हिताची आहे. मात्र, या सुविधा माध्यमापर्यंत न राहता समाज माध्यमे आणि प्रवासी संघटनांच्या माध्यमातून ही माहिती लोकल प्रवाशांपर्यंत पोहोचली पाहिजे. जर प्रवाशांना माहिती मिळालीच नाही तर कितीही चांगल्या सुविधा आल्या तर त्याचा फायदा होणार नाही. - सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
१२ गाड्यांमध्ये सुविधा मुंबई विभागातील १२ गाड्यांमध्ये सध्या हॅन्ड हेल्ड टर्मिनलसह तिकीट तपासणी होते आहे. याच्या वापरामुळे तिकीट पर्यवेक्षकांकडे असलेले कागदी चार्ट बंद होतील. - प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
कोणत्या गाड्यांमध्ये वापर सुरू?
गाडी क्रमांक या आहेत गाड्या११०८५/८६ एलटीटी- मडगाव डबल डेकर १२२२३/२४ एलटीटी - एर्नाकुलम दुरांतो १२२९३/९४ एलटीटी - प्रयागराज दुरांतो १२१०९/१० पंचवटी एक्स्प्रेस १२१२३/२४ सीएसएमटी डेक्कन क्वीन २२२२१/२ सीएसएमटी हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस