जितेंद्र कालेकर,
ठाणे-ठाणे परिवहन सेवा (टीएमटी) तोट्यात जाण्यास ३० पैकी २६ सहायक वाहतूक निरीक्षक (टीसी) जबाबदार असल्याचा ठपका ठेवत त्यांची आगामी दोन वर्षांची वेतनवाढ रोखल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. नादुरुस्त बस, प्रवाशांच्या तुलनेत अपुरी संख्या, खासगी बसची वाहतूक रोखण्यात आलेले अपयश, दुरुस्ती-देखभालीचा अभाव, अशा अनेक कारणांमुळे टीएमटीचे उत्पन्न कमी होत असताना त्याचा नाहक ठपका टीसींवर ठेवल्याचा त्यांचा दावा आहे. वेतनवाढ रोखण्याचा आदेश मागे घेण्यात यावा, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना साकडे घातले आहे.टीएमटीचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी २ एप्रिलला पालिका मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत टीसी, वाहतूक अधीक्षक आणि व्यवस्थापक सुधीर राऊत यांनाही पाचारण केले होते. या वेळी आयुक्तांनी सर्वांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी कारवाईबद्दल स्पष्टीकरण देणाऱ्याची वेतनवाढ रोखण्याचे आदेश राऊत यांना दिले. टीएमटी तोट्यात जाण्यास अनेक कारणे असताना फक्त टीसींना जबाबदार धरून २६ जणांवर कारवाई केल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बसमधून उतरणाऱ्यांची तिकिटे तपासण्याव्यतिरिक्त टीसींकडे इतर २० ते २५ कामांचा समावेश आहे. सध्या टीएमटीच्या ताफ्यातील ३३१ पैकी जवळजवळ १५० च्या आसपास बस दुरुस्तीसाठी उभ्या आहेत. कळवा आणि वागळे इस्टेट आगारांतील अनेक बस चालकांना उशिरा दिल्या जातात. त्यामुळे बसचे किलोमीटरही कमी होते. ज्या बस बाहेर पडतात, त्यातील ३० ते ४० बे्रेकडाऊन होतात. त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो.त्याच वेळी खासगी बसेस विनापरवाना अवघ्या १० ते १५ रुपयांमध्ये प्रवाशांची ने-आण करतात. काही मार्गांवर टीएमटीपेक्षा कमी दराने एसटीच्याही फेऱ्या होतात. शेअर आॅटोचीही सुविधा असल्यामुळे प्रवासी बसची वाट न पाहता उपलब्ध वाहनांचा वापर करतात.