लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील ३५ अधिकृत हॉटेल थांब्यांवर प्रवाशांसाठी एसटी प्रशासनाने अल्पोपाहार सेवा सुरू केली आहे. या सेवेत चहा-नाश्ता अवघ्या ३० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येत आहे. एसटीचे तिकीट दाखवून प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एसटीची प्रवासी संख्या वाढवण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध उपाय राबवण्यात येत आहेत. ही योजना त्याचाच एक भाग आहे.राज्यातील ठाणे-३, मुंबई-४, पुणे-९, नाशिक-५, सातारा-४, अहमदनगर-५ या ठिकाणी हॉटेलच्या अधिकृत थांब्यावर ही योजना सुरू आहे. त्याचबरोबर बुलडाणा, औरंगाबाद, जालना, बीड या मार्गावर प्रत्येकी एका हॉटेलच्या थांब्यावर ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी एसटी प्रशासनाने संबंधित हॉटेलचालकाशी एक वर्षाचा करार केला आहे. त्यानुसार या हॉटेलमालकाने चहा आणि नाश्ता ३० रुपयांत देणे बंधनकारक आहे.या योजनेअंतर्गत शिरा, पोहे, उपमा, वडा-पाव, इडली, मेदू-वडा अशा पदार्थांपैकी कोणताही एक पदार्थ आणि चहा याची एकूण किंमत ३० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
राज्यात ३५ एसटी थांब्यांवर ३० रुपयांत चहा-नाश्ता
By admin | Published: July 14, 2017 5:36 AM