मुंबई - देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, त्यातील ५५ वर्ष केंद्रात काँग्रेसची सत्ता राहिली. काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना आदिवासी समाजावर अत्याचार होऊ दिले नाहीत पण भाजपा सरकारच्या काळात मात्र मणिपूर असो वा महाराष्ट्र सर्व भागात अत्याचार वाढले आहेत. आदिवासीच या देशाचा मुळनिवासी आहे, जल, जमीन जंगलवर त्यांच्याच अधिकार आहे परंतु आदिवासींची ही संस्कृतीच संपवण्याचे पाप भाजपा करत आहे, या भाजपाला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्ह बिरसा ब्रिगेडने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता. यावेळी मार्चेकरांना मार्गदर्शन करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, जमिनीचे पट्टे देण्याचा अधिकार काँग्रेस सरकारने दिला असतानाही भाजपा सरकार नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना हे जमीन पट्टे देण्यात टाळाटाळ करत आहे. भाजपा आदिवासी समाजाला आदिवासी नाही तर वनवासी म्हणतो, वनवासी म्हणजे कायम वनातच राहणारे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले ते संविधानच संपवण्याचे काम भाजपा करत आहे पण याच बाबासाहेबांनी आपल्याला मतांची तलवार दिलेली आहे, त्याचा वापर करा आणि भाजपाचा धडा शिकवा असे आवाहन नाना पटोले यांनी केले.
मणिपूर पेटले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर काहीच बोलत नाहीत, त्यांना देश पेटवायचा आहे. लोक भाजपाला भारत जलाव पार्टी असे म्हणतात तेच खरे आहे. नरेंद्र मोदी सरकार गरिबांच्या खिशातले पैसे काढून श्रीमंतांचे खिसे भरत आहे. महागाईने जगणे मुश्कील झाले आहे, सिलिंडर महाग केले, वीज बिल वाढवले, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, तरुण मुले शिकून मोठी झाली पण या तरुणांच्या हाताला रोजगार नाही, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत पण हा विकास आदिवासी बांधवांपर्यंत पोहचलेलाच नाही, असेही नाना पटोले म्हणाले.
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाज व बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आमदार हिरामण खोसकर, माजी मंत्री शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष आकाश छाजेड, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ब्रीज दत्त, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, राहुल दिवे बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्यासह पदाधिकारी व हजारो आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.