मुंबई - गेल्या आठवड्यात झालेल्या पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्याचे दु:ख आपल्या सर्वांच्या मनात आहे. आता या हल्ल्याचा कशा प्रकारे बदला घेतला जातो, याची वाट देशवासीय पाहत आहेत. पाकिस्तान हा सुधरणारा नाही त्यामुळे पाकिस्तानचे कायमचे कंबरडे मोडले पाहिजे जेणेकरून त्यांना पुन्हा उठता येणार नाही, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एनएससीआय डोम येथे आयोजित लोकमत महाराष्ट्रीन ऑफ द इअर पुरस्कार सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पॉवर आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी ही मागणी व्यक्त केली. उद्धव ठाकरे उपस्तितांना संबोधित करताना म्हणाले, ''युतीबाबत काय बोलायचे, विरोधकांना काय उत्तर द्यायचे हे इतर ठिकाणी पाहू. येथे मी राजकारणावर काही भाष्य करणार नाही. गेल्या आठवड्यात पुलवामा येथे आपल्या जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या दु:खाची झालर या कार्यक्रमावरही आहे. आता या हल्ल्याचा कशा प्रकारे बदला घेतला जातो, याची वाट देशवासीय पाहत आहेत. पाकिस्तान हा सुधरणारा नाही त्यामुळे पाकिस्तानचे कायमचे कंबरडे मोडले पाहिजे जेणेकरून त्यांना पुन्हा उठता येणार नाही,'' दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेची धुरा यशस्वीपणे वाहणाऱ्या आणि कठीण परिस्थितीत पक्षाला योग्य दिशा दाखवणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकमत महाराष्ट्रीन ऑफ द इअर पुरस्कार सोहळ्यात पॉवर आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बुधवारी मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
LMOTY 2019 : पुन्हा उठता आलं नाही पाहिजे अशा पद्धतीने पाकिस्तानचे कंबरडे मोडा - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 8:36 PM