ओरोस : कोकणचा विकास हाच ध्यास समोर ठेवून राष्ट्रवादीने काम केले आहे. मात्र, सत्ता बदलानंतर कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळले आहे. ते वाढविण्यासाठी कार्यकर्ते मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून समाजात जाऊन चांगले काम करणारा कार्यकर्ता निर्माण करून पक्ष संघटना मजबूत करा, असे आवाहन करतानाच पक्षापेक्षा स्वत:ला मोठे समजून इतर पक्षात जाऊन मोठ्या पदावर असणाऱ्या गद्दाराला आगामी नगरपरिषद निवडणुकीत धडा शिकवा, अशी तोफ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर नाव न घेता कार्यकर्ता मेळाव्यात डागली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा येथील शरद कृषी भवनात प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, उपाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा पक्ष निरीक्षक शरद कुलकर्णी, रत्नागिरीचे पक्ष निरीक्षक बाबाजी जाधव, सुरेश दळवी, प्रवीण भोसले, अशोक पराडकर यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाने कोकणच्या विकासासाठी अनेक चांगल्या योजना राबविल्या. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी चांगले निर्णय घेतले. १०० टक्के अनुदानावर फळ लागवड योजनेसारख्या विविध योजना राबविल्या. शरद पवारांची धोरणे व निर्णय हे जनतेच्या हिताचेच होते; पण मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोदींनी दिलेल्या ढोबळ आश्वासनांना जनता बळी पडली. मोदी सरकार केंद्रात व राज्यात विराजमान झाले. आज वर्ष पूर्ण झाले तरी जनतेला चांगले दिवस काही आले नाहीत. सत्तेसाठी गळाभेटी घेतलेल्या शिवसेनेलाही आता या सरकारात किंमत राहिलेली नाही. जिल्ह्यातील काही मंडळी स्वत:च्या स्वार्थासाठी राष्ट्रवादीशी गद्दारी करून शिवसेनेत गेले. मंत्रिपदावर बसले आहेत. त्यांनाही आपली छाप पाडता आली नाही, अशी टीका दीपक केसरकर यांचे नाव न घेता केली. देशाचे पंतप्रधान विदेश दौऱ्यात गुंतले आहेत. त्यांना देशाचा कारभार करायला वेळ आहे कुठे? दिवसेंदिवस महागाईसह विविध समस्या वाढत आहेत; पण युती सरकार यावर नियंत्रण ठेवू शकत नाही.तेव्हा आता जनतेला आघाडी सरकारशिवाय पर्याय उरलेला नाही. मागील निवडणुकांमध्ये काँग्रेस आघाडीला मिळालेल्या अपयशामुळे कार्यकर्ते खचले आहेत. त्यांनी अपयश बाजूला ठेवून नव्या जोमाने कामाला लागा. पक्ष बळकट करून आगामी निवडणुकीत आपली ताकद दाखवत स्वार्थासाठी पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा. काल काय झाले यापेक्षा उष:काल घडविण्यासाठी प्रयत्नशील राहा. गटबाजीविरहित पक्षाला वाहून घेणारा सच्चा कार्यकर्ता हवा आहे. त्यासाठी कामाला लागा, असे प्रतिपादन यावेळी सुनील तटकरे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे म्हणाले की, राज्यात व देशात सत्ता बदलानंतर झपाट्याने विकास होईल अशी आश्वासने देण्यात आली; पण कुठे आहे विकास? आघाडी शासनाचा कोकणचा विकास हाच ध्यास होता. मात्र, मोदी आश्वासनांना जनता बळी पडली आहे. युती सरकारकडे विकासाचे व्हिजन नाही हे जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे विकास हवा असेल तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला प्रामाणिकपणे साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.सुरेश दळवी, प्रवीण भोसले, शरद कुलकर्णी, व्हिक्टर डान्टस यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंतर्गत हेवेदावे विसरून कामाला लागत पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा, स्वार्थासाठी पक्ष सोडणाऱ्यांना ताकद दाखवायची वेळ आली आहे. नगरपंचायतीसह निवडणुकांमध्ये ती संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन केले. (वार्ताहर)शिवसेना शांत का?स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करणारे लिखाण एका मासिकात प्रसिद्ध झाले आहे. त्या मासिकाचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध नोंदवितानाच बाळासाहेबांना देव मानणारा कार्यकर्ता आता गेला कुठे? त्यांनी सहन कसे केले? यावर शिवसेना शांत का? असा सवालही आमदार तटकरे यांनी केला आहे, तर शिवसेनेत पूर्वीसारखा जोश राहिला नसल्याचेही स्पष्ट केले.
गद्दारांना निवडणुकीत धडा शिकवा
By admin | Published: August 19, 2015 11:35 PM