शशी करपे,
वसई- शिक्षक दिन उलटून गेल्यानंतरही पालघर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासह तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अद्याप जाहीर करण्यात न आल्याने शिक्षकांंमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात ठाणे जिल्हा परिषद आणि खाजगी मिळून तीन हजारांहून अधिक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत. मात्र, नव्या जिल्ह्यातील शिक्षण खात्याकडून प्रत्येक कामात दिरंगाई होऊ लागली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक शाळा पटसंख्येअभावी बंद पडू लागल्या आहेत. कित्येक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यातच, आता नव्या जिल्ह्याच्या निर्मितीनंतरचा दुसरा वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात शिक्षण विभागाकडून दिरंगाई होत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. शिक्षक दिन उलटून गेल्यानंतरही शिक्षण विभागाने जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांची अद्याप घोषणा केलेली नाही.तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा प्रत्येक पंचायत समितीमार्फत केली जाते. जिल्हास्तरीय पुरस्कारांची घोषणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्याकडून केली जाते. मात्र, पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांतून अद्याप आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा झालेली नाही. तसेच जिल्हास्तरीय पुरस्कारांचीही घोषणा होणे बाकी आहे. याप्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांच्याशी लोकमतने गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास संपर्क साधला असता, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांची यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर, अवघ्या तासाभरातच भागवत यांनी यादीला मंजुरी मिळाली असून पालकमंत्र्यांची वेळ मिळाल्यानंतर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण केले जाईल, अशी माहिती दिली. >ठाण्यातील परंपरा पालघर जिल्ह्यातही सुरु राहिलीजिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांची यादी गुुरुवारी मंजूर झाली असली तरी जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील आदर्श शिक्षक पुरस्कारांसंबंधी मात्र भागवत यांनी पंचायत समितीकडे बोट दाखवले. एक समिती आदर्श शिक्षकांची निवड करते, अशी माहिती भागवत यांनी दिली. पण, जिल्ह्यातील एकाही पंचायत समितीने अद्याप पुरस्कार का जाहीर केले नाहीत.नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर शिक्षक विभागाने गेल्या वर्षी पहिल्यांदा पुरस्कार देताना खाजगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना आदर्श पुरस्कार देण्यास निधी नसल्याचे कारण देऊन असमर्थता व्यक्त केली होती. त्या वेळी ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेने पुढाकार घेऊन माध्यमिक शिक्षकांना पुरस्कार देण्याची प्रथा सुरू ठेवण्याचा आग्रह धरला.तत्कालीन ठाणे जिल्हा परिषद नियमितपणे पुरस्कार देत असताना ही परंपरा नव्या जिल्ह्यातही सुरू राहावी, यासाठी माध्यमिक शिक्षकांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या खर्चाचा भार पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीने उचलला होता. त्यामुळे पुरस्कारांची परंपरा सुरू राहिल्याची माहिती पतपेढीचे तत्कालीन अध्यक्ष पी.टी. पाटील यांनी दिली.