पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल मंगळवारी (दि. १०) दुपारी एक वाजता संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. राज्यभरातून सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.परिषदेमार्फत दि. २२ जुलै रोजी टीईटी घेण्यात आली होती. इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी अशा दोन गटात राज्यात एकूण १ हजार १८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. पेपर एकसाठी मराठी, इंग्रजी, उर्दू या सर्व माध्यमांसाठी १ लाख ६९ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी तर पेपर दोनसाठी एकुण १ लाख २७ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पेपर एक व पेपर दोनचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना पाहता येईल.या निकालाबाबत पात्रतेसाठी आरक्षण प्रवर्ग, वैकल्पिक विषय, अपंगत्व याचा लाभ मिळाला नसल्यास परिषदेकडे दि. २० आॅक्टोबरपर्यंत तक्रार करता येणार आहे. आॅनलाईन अर्जातील माहितीनुसार निकाल तयार करण्यात आलेला असून त्यात तफावत आढळून आल्यास त्याबाबत परिषदेकडून विचार केला जाईल. तक्रारींचा विचार करून संबंधित विद्यार्थ्यांच्या निकालात बदल केला जाईल. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात येईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली.दरम्यान, परीक्षेदरम्यान मराठी माध्यमाच्या प्रश्पपत्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात चुका आढळून आल्या होत्या. त्यामुळे परिषदेच्या कामकाजावर त्यावेळी बरीच टीकाही झाली होती. विषय तज्ज्ञांकडून संबंधित प्रश्नपत्रिकांची तपासणी करून चुका झालेले प्रश्न रद्द करण्याचा निर्णय परिषदेने घेतला. त्यानुसार उत्तरसुचीही जाहीर करण्यात आली. तसेच रद्द करण्यात आलेल्या प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना न देता उर्वरीत प्रश्नांच्याआधारे निकाल जाहीर करणार असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार निकाल जाहीर केला जाणार आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल उद्या संकेतस्थळावर जाहीर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 9:00 PM