लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना निवडणूक आयोगाने बुधवारी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर केली. या चार जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होत आहे. १३ जूनला मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल. ४ जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाठोपाठ विधानपरिषदेची निवडणूक होत असल्याने राजकीय वातावरण आणखी तापणार आहे.
विधानपरिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धवसेनेचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने येणार आहेत.
निवडणुकीचा कार्यक्रम १५ मे : अधिसूचना. २२ मे : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत. २४ मे : छाननी. २७ मे : अर्ज मागे घेण्याची मुदत. १० जून : सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान. १३ जून : मतमोजणी व निकाल
नावांवरून रंगणार चर्चा nमुंबई पदवीधर : उद्धवसेनेकडून विलास पोतनीस यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. nमुंबई शिक्षक : विद्यमान आमदार कपिल पाटील हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. त्यामुळे आघाडीकडून पाटील हेच उमेदवार असू शकतात. nनाशिक शिक्षक : ही जागा उद्धवसेनेकडून लढवली जाईल. महायुतीत जागावाटप झाल्यानंतरच उमेदवार जाहीर केले जातील. nकोकण पदवीधर : ही जागा लढविण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. गेल्यावेळी ही जागा शिवसेनेने लढवली होती. त्यामुळे यावरून उद्धवसेना-काँग्रेस सामना रंगू शकतो. येथे भाजप पुन्हा निरंजन डावखरेंना संधी देऊ शकते.