पुणे : राज्यभरातील सर्व शाळांमधील शिक्षक भरती ही अभियोग्यता चाचणीव्दारे गुणवत्तेनुसार होणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र अचानक त्यामध्ये बदल करून खासगी संस्थांच्या अनुदानित शाळांमध्ये दहा उमेदवारांमधून एक शिक्षक निवडण्याची मुभा शिक्षण संस्था चालकांना देण्यात आली आहे. यामुळे शिक्षक भरतीसाठी पुन्हा एकदा घोडेबाजार भरवून शिक्षक भरतीसाठी लाखो रूपयांचे डोनेशन घेण्याचा संस्थाचालकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीचा शासनाचा निर्णय केवळ फार्स ठरणार आहे. शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा सुधारित अध्यादेश शासनातर्फे गुरूवारी काढण्यात आला. यामध्ये भरती प्रक्रियेतील या नवीन बदलांची घोषणा करण्यात आली आहे. खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक भरतीमध्ये शासनाला कुठलाही हस्तक्षेप करता येणार नसल्याचे स्पष्ट करून राज्य शासनाने आपले हात झटकले आहेत. त्यामुळे अभियोग्यता चाचणीत मिळालेल्या गुणांनुसार आपल्याला लगेच नोकरी मिळणार या आशेवर बसलेल्या हजारो पात्रताधारक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकांच्या एका रिक्त जागेसाठी दहा उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. ही मुलाखत ३० गुणांची असणार असून या मुलाखतीमीधल गुणांच्याआधारे संस्थाचालकांकडून शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्य शासनाने गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करण्यासाठी डी.एड. व बीएड झालेल्या उमेदवारांची २०० गुणांची अभियोग्यता चाचणी घेतली. या चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड होईल असे जाहीर केले होते. मात्र शासनाने केलेल्या भरती प्रक्रियेतील नवीन दुरूस्तीमुळे त्याचा मुळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. संस्थाचालकांना त्यांच्या मर्जीतील उमेदवारांची शिक्षक म्हणून निवड करता येईल तसेच शिक्षक भरती करताना लाखो रूपयांचे डोनेशन पूर्ववत घेता येईल अशी तरतुद या नवीन दुरूस्तीमुळे करण्यात आल्याची भावना पात्रताधारक शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शासनाकडून गुणवत्तेवर आधारित शिक्षक भरतीचा करणार असल्याचा शासनाकडून केला जात असलेला दावा पूर्णपणे फोल ठरला असल्याची भावना पात्रताधारक उमेदवारांनी व्यक्त केली आहे. शिक्षक भरतीच्या जागा लवकर निघत नसल्याची नाराजी असताना पुन्हा असा निर्णय घेतल्याने त्यांच्यामधील असंतोषामध्ये वाढ झाली आहे.नवीन सुधारणांनुसार महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील भरती मात्र अभियोग्यता चाचणीतील गुणांच्या आधारे होऊ शकेल ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. .............आता शिक्षक होण्यासाठी वयाची अटशिक्षक भरती प्रक्रियेबाबत केलेल्या सुधारणांच्या अध्यादेशानुसार आता शिक्षक भरतीसाठी वयाची अट लागू करण्यात आली आहे. खुल्या प्रवगार्तील उमेदवार वयाच्या ३८ वर्षांपर्यंतच तर मागास प्रवगार्तील उमेदवार वयाच्या ४३ वर्षांपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. गेल्या ६ वर्षांपासून शिक्षक भरती केली नाही, त्यातच त्यामुळे अनेकांची नोकरीची वय उलटून गेली आहेत. त्यामुळे या अटीबदद्लही पात्रताधारक शिक्षकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
................................
शासनाचे नियंत्रण हवेच होतेखासगी संस्थाच्या शाळांच्या शिक्षक भरती प्रक्रियेचे सर्व अधिकार संस्था चालकांना असतील या प्रक्रियेत राज्य शासनास हस्तक्षेप करता येणार नाही अशी दुरूस्ती गुरूवारी काढलेल्या अध्यादेशात करण्यात आली आहे. वस्तूत: खासगी संस्थाचालक योग्यप्रकारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवित आहेत ना यावर शासनाचे नियंत्रण असणे आवश्यक होते. मात्र शासनाने हात झटकल्याने पात्रताधारक शिक्षकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.