मुंबई : चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा बलात्कार, विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या प्राथमिक शिक्षकावर नोंदवण्यात आलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने शिक्षकावरील गुन्हा रद्द करण्यास नकार दिला.विद्यार्थिनींच्या पालकांशी सामंजस्याने तडजोड केल्याचा दावा करत अनिल सकपाळ या शिक्षकाने त्याच्यावर नोंदवण्यात आलेला बलात्काराचा आणि विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पालकांनीही उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत सकपाळविरोधातील तक्रार पुढे चालवायची नसल्याचे खंडपीठाला सांगितले. सकपाळ याने चौथी व पाचवीत शिकणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला आणि बलात्कारही केला. ‘चारही विद्यार्थिनींचे सीआरपीसी (फौजदारी दंडसंहिता) कलम १६४ अंतर्गत जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यांचा जबाब आणि त्यांच्या पालकांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात विसंगती आहे. गैरसमज झाल्याचे पालकांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. या प्रकरणी आरोपपत्र आधीच दाखल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयाला विशेष अधिकारांचा वापर करायचा नाही,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने सकपाळला दिलासा देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)
शिक्षकावरील गुन्हा रद्द करण्यास नकार
By admin | Published: July 05, 2016 1:30 AM