वडगाव मावळ : मावळ तालुक्यात अनेक गावांत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांवर गावातील सरपंच आणि शालेय व्यवस्थापन समिती आपल्या पदाचा दुरुपयोग करून दबाव टाकत आहेत. त्यामुळे ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर सरपंच आणि समितीची मर्जी संभाळण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३२० शाळा असून, ९६१ शिक्षक आहेत. सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. तालुक्यात अनेक आदर्श शिक्षक आहेत. परंतु सर्व शिक्षकांना गावातील कारभाऱ्यांच्या मनमानीचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. गावात अनेक पक्षांचे राजकीय कार्यकर्ते असल्यामुळे शिक्षक हा सर्वांशी हसून-खेळून राहत असतो. त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसतो. परंतु गावातील विरुद्ध गटाच्या कार्यकर्त्याशी शिक्षक बोलताना दिसल्यास सरपंचाला राग अनावर होतो व तो थेट शिक्षकांना टार्गेट करतो. तुम्ही त्या पार्टीचे काम करता का, तुम्ही मला पाहून नमस्कार का केला नाही, मी गावचा सरपंच आहे. तुमची बदली करतो. तुम्ही नीट शिकवत नाही. सकाळी किती वाजता शाळेत आला, असे उलटसुलट वादग्रस्त प्रश्न शिक्षकांना विचारतात. अशा वेळी शिक्षकाला त्याची नेमकी चूक काय आहे हेही कळत नाही. त्यातच भर म्हणून शालेय व्यवस्थापन समितीदेखील सरपंचांच्याच पार्टीतील असल्यामुळे तेही पुढे येऊन शिक्षकांवर आरोप करायला सुरुवात करते. शिक्षकांवर समितीचे काही अध्यक्ष भ्रष्टाचाराचे आरोप करतात. सरांनी शालेय पोषण आहार योजनेमध्ये घोटाळा केला. मुलांना नीट जेवण दिले नाही. हजारो रुपयांचा अपहार केला असे सिद्ध न होणारे आरोप करून शिक्षकांची प्रतिमा तालुक्यात खराब करण्याचे काम काही जण करीत आहेत. यामुळे तालुक्यातील बहुतांश शिक्षक हे तालुक्याबाहेर बदली करून मागत आहे. अनेक गावांत स्थानिक राजकारणाचा फटका शिक्षकांना बसत आहे. काही दिवसांपूर्वी एका गावाच्या सरपंचांला नमस्कार घातला नाही म्हणून त्यांनी त्या गावातील शिक्षकांवर बिनबुडाचे त्यांची प्रतिमा मलीन होईल, असे आरोप केले. यानंतर आपली नोकरी जाईल या भीतीपोटी शिक्षकाने आपल्या पत्नीसह सरपंचाच्या घरी जाऊन त्यांची माफी मागितली. अशा प्रकारांमुळे तालुक्यातील शिक्षकांमध्ये भीतीयुक्त वातावरण असून, असेच घडत राहिल्यास मावळातील शिक्षकांचे पर्यायाने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)मावळ तालुक्यातील बहुतांश सरपंच हे निष्क्रिय असून, फक्त नामधारी आहेत. ते आपल्या पदाचा गावाच्या विकासकामासाठी वापर न करता आरोग्य सेवक, ग्रामसेवक, शिक्षक यांच्यावर रुबाब दाखवण्यासाठी करतात. ते सरकारी नोकरांना अरेरावी करतात. अशी अरेरावी करणाऱ्या सरपंचांच्या गावामध्ये ५० टक्केदेखील अजून शौचालये नाहीत. जास्तीत जास्त वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी आणि गाव निर्मल करण्यासाठी असे महाशय प्रयत्न करताना दिसत नाहीत. सरपंचपदाची कोणतीही कामे करत नाहीत. जबाबदाऱ्या पाळत नाहीत. पण आपण सरपंच असल्याचा रुबाब मात्र तालुकाभर फिरून दाखवतात.
शिक्षक करताहेत दडपणाखाली काम !
By admin | Published: October 31, 2016 1:42 AM