डोंबिवली : सागाव येथील जयभारत इंग्लिश शाळेतील इयत्ता आठवीच्या दोन विद्यार्थ्यांनी शिक्षिकेविषयी शाळेच्या भिंतीवर अपशब्द लिहिले होते. याबाबत, शिक्षिकेने शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. व्यवस्थापनाकडून कारवाई होणे अपेक्षित असताना शिक्षिकेने पतीकरवी त्या विद्यार्थ्यांना एका ठिकाणी बोलवत अन्य दोन व्यक्तींच्या मदतीने मारहाण केली. तसेच त्यांना धमकावले. याप्रकरणी शाळा व्यवस्थापनाने शिक्षिकेविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याप्रकरणाची गंभीर दखल घेतली नसल्याने शिक्षिकेविरोधात शाळा व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई केली आहे. चौकशीत सत्य उघड होत नाही, तोपर्यंत शिक्षिकेचे निलंबन कायम राहणार आहे. दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने तक्रार अर्ज मागे घ्यावा, यासाठी भाजपा महिला आघाडीतर्फे दबाव टाकला जात आहे, असा आरोप शाळा व्यवस्थापनाने केला आहे.शिक्षिका रोहिणी शर्मा यांच्याविषयी दोन विद्यार्थ्यांनी भिंतीवर अपशब्द लिहिले होते. हा प्रकार शर्मा यांनी मुख्याध्यापिका ज्योत्स्ना अय्यर यांच्या निदर्शनास आणून दिला. त्याची दखलही अय्यर यांनी घेतली. शिक्षिकेचा दोन मुलांवर संशय होता. मात्र, त्याच मुलांनी हे प्रकरण केले आहे, याची शहानिशा केल्याशिवाय मुलांना शिक्षा कशी देणार? त्यामुळे संशयित मुलांच्या पालकांना मुख्याध्यापिकेने शाळेत बोलावून घेत घडलेला प्रकार सांगितला. मात्र, मुख्याध्यापिकेकडून न्याय मिळणार नाही, असा समज करून घेत शिक्षिकेने त्यांच्या पतीकरवी दोन जणांच्या मध्यस्थीने दोन मुलांना एका इमारतीत बोलावून घेतले. त्यांना मारहाण करत दमही भरला. हा प्रकार पालकांनी मुख्याध्यापिकेच्या कानांवर घातला. यामुळे अय्यर यांना धक्काच बसला. मुख्याध्यापिका अय्यर व शाळेचे विश्वस्त के. शिवा अय्यर यांनी मुलांना मारहाण करणाऱ्या व्यक्तींची नावे शिक्षिकेला विचारली. मात्र, तिने नावे सांगितली नाहीत. त्यावर, विश्वस्त व अय्यर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात २१ फेब्रुवारीला तक्रार अर्ज दिला. मात्र, अद्याप पोलिसांनी तिच्याविरोधात कारवाई केलेली नाही. याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत व्यवस्थापनाने शिक्षिकेस निलंबित केले आहे. विद्यार्थ्याचे वडील मोहन राम यांनी सांगितले की, माझा मुलगा सुरज राम व त्याचा वर्गमित्र यांच्याकडून चूक झाली. त्यांना शाळेने शिक्षा करण्याऐवजी अशी गुंडाकरवी शिक्षा करणे कितपत योग्य आहे. मुलांनी या प्रकरणाचा मानसिक धसका घेतला आहे. विद्यार्थी सुरज याने सांगितले की, त्याला एका बारमध्ये दोन जणांनी बोलावून घेतले. त्याच्या खिशातील २०० रुपये घेऊन त्याला मारहाण केली. माफी माग आणि आणखी पैसे घेऊन ये, असे धमकावले. पहिल्या दिवशी दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत एका ठिकाणी कोंडून ठेवले होते. मारहाणही केली. दरम्यान, मुख्याध्यापिका व विश्वस्त अय्यर म्हणाले की, याप्रकरणी पोलीस चौकशी करीत नाहीत. तसेच तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी भाजपाच्या महिला आघाडीकडून दबाव आणला जात आहे. (प्रतिनिधी)>शिक्षिकेच्या हातून चूक झालीयाप्रकरणी भाजपा महिला आघाडीच्या सुहासिनी राणे म्हणाल्या की, मुलांना शाळेबाहेर मारहाण झाली आहे. त्याचे आम्ही समर्थन करणार नाही. मुलांचीही चूक आहे. शिक्षिकेच्या हातून चूक झाली आहे, हे शिक्षिकाही मान्य करीत आहे.>आरोप चुकीचा स्थानिक भाजपा नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी सांगितले की, हे प्रकरण माझ्या प्रभागात घडले होते. त्यामुळे आम्ही ते मिटवण्यासाठी गेले होते. दबाव टाकल्याचा आरोप चुकीचा आहे. >योग्य चौकशी करणारमानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले म्हणाले की, तक्रार अर्ज आलेला आहे. योग्य ती चौकशी केली जाईल.
शिक्षिकेच्या पतीची विद्यार्थ्यांना मारहाण
By admin | Published: March 03, 2017 4:11 AM