ठाणे : शाळेची फी भरली नाही, म्हणून दुसरीतील विद्यार्थिनीचे केस उपटल्याचा खळबळजनक प्रकार सावरकरनगरातील ज्ञानोदय विद्यामंदिरात घडला. घटना घडल्यानंतर पाच दिवसांनी शनिवारी याबाबत वर्गशिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इंदिरानगरात राहणारी प्राची गुप्ता ही ज्ञानोदय विद्यामंदिरात इयत्ता दुसरीच्या ‘अ’ तुकडीमध्ये शिकते. शाळेचे शुल्क भरले नाही म्हणून १७ जानेवारीला तिला शाळेत मारहाण करण्यात आली. या चिमुकल्या विद्यार्थिनीच्या डोक्यावरील केसही उपटण्यात आले. प्राची घरी परतल्यानंतर पालकांना हा अमानुष प्रकार समजला. पालकांनी आधी याबाबत शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली. त्यानुसार वर्गशिक्षिका रेखा नायर यांना निलंबित करून प्रकरणाची चौकशीही सुरू करण्यात आली. त्यात फारशी प्रगती नसल्याने पाच दिवसांनी म्हणजे २१ जानेवारीला तिचे वडील अखिलेश गुप्ता यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार वर्गशिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. याबाबत शाळा व्यवस्थापनाची बाजू समजू शकलेली नाही. (प्रतिनिधी)
शाळेच्या फीसाठी शिक्षिकेने उपटले विद्यार्थिनीचे केस!
By admin | Published: January 23, 2017 4:20 AM