मुंबई: राज्यात सर्वत्र इयत्ता दहावीच्या नव्या अभ्यासक्रमावर शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. इयत्ता दहावीची नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व पाठ्यपुस्तके बाजारात आलेली आहेत व त्यानुसार सर्व विषयाची प्रशिक्षणेही सुरू झाली आहेत. मात्र, इयत्ता दहावीच्या नवीन आलेल्या अभ्यासक्रमासाठी सर्व विषयांची पुस्तके बाजारात उपलब्ध झाली असली, तरीही यंदा नव्यानेच आलेला कला रस आस्वादाचा, तसेच स्व विकास विषयाची पुस्तके मात्र अद्यापही शिक्षकांना उपलब्ध झालेली नाहीत. शिक्षकांचे प्रशिक्षण लवकरच सुरू होणार असून, शिक्षकांना त्यांच्या सॉफ्ट कॉपी उपलब्ध करून दिल्याची माहिती मिळाली आहे.दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्ये स्व-विकास आणि कला रसास्वाद या विषयाचे पाठ्यपुस्तक कुठेही उपलब्ध नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. बालभारतीच्या डेपोमध्ये ही पुस्तके नंतर उपलब्ध झाली असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. मात्र, पुणे, मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत अद्यापही ही पुस्तके उपलब्ध झालेली दिसून येत नाहीत.तज्ज्ञ मार्गदर्शकांसाठी १६ तारखेला राज्यस्तरीय व १९ तारखेला तालुका स्तरीय प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत बाजारात पुस्तके नसताना या विषयांचे शिक्षकांचे प्रशिक्षण कसे घेणार, असा प्रश्न आता अधिकाऱ्यांना पडल्यानंतर अखेर त्याची सॉफ्ट कॉपी शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहेत.
शिक्षकांना प्रशिक्षणासाठी पुस्तकांची सॉफ्ट कॉपी,दहावीची स्वविकास व कलेची पुस्तकेच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 2:43 AM