अहमदनगर : येथील जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची रविवारची सर्वसाधारण सभाही गोंधळ, धक्काबुक्की, हाणामारीच्या परंपरेने गाजली. सभेच्या सुरूवातीपासून सत्ताधारी-विरोधी गटाचे शिक्षक सभासद एकमेकांना भिडले. शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. मद्यधुंद शिक्षकांनी व्यासपीठावर चढून धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला.मंजूर, नामंजूरचे फलक झळकवण्यात येत होते. सभेला साधारण तीन हजारांच्या जवळपास शिक्षक होते. त्यात सत्ताधाऱ्यांच्या ७० टक्के सभासदांचा समावेश होता. व्यासपीठावर माईक ताब्यात घेण्यावरून शिक्षकांमध्ये अनेकदा झटापट झाली. व्यासपीठावर चढवण्यावरून शिक्षकांची धक्काबुक्की झाली. सुरुवातीचे दीड तास गोंधळातच गेले.बँकेच्या इतिहासात गुरूमाउली मंडळाने सहा तास सभेचे कामकाज चालवत अनेक ठराव घेतले. त्यात कोअर बँकिंग घोटाळा, संचालक मंडळाने केलेल्या सव्वा कोटी रुपयांचा खर्च नामंजूर करण्यासोबत सभासद शिक्षकांना कन्यारत्न झाल्यास बँकेच्या नफ्यातून मुलीच्या नावे ११ हजार रुपयांच्या ठेव पावतीच्या निर्णयांचा समावेश आहे.