शासनाकडून चालढकल : अनुदानपात्र शाळांची यादी जाहीर करावी
मुंबई : अनुदानपात्र म्हणून घोषित झालेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांसाठी सन २०१२-१३ पासून वेतन अनुदानाची आर्थिक तरतूद करण्याची मागणी करीत महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीने मंगळवारी आझाद मैदानात थाळीनाद आंदोलन केले. मूल्यांकनानंतर शासन आणि प्रशासनाकडून विलंब झाल्याने अनुदानपात्र शाळांची यादी घोषित करण्यास आधीच विलंब झाल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचे समितीचे म्हणणे आहे.मूल्यांकनातील त्रुटी पूर्ण केलेल्या व निकषपात्र ठरलेल्या शाळांची यादी शासनाने अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे पात्र शाळांची यादी जाहीर करून अधिवेशन काळात त्यांना आर्थिक तरतूद करण्याची मागणी समितीने केली आहे, जेणेकरून आॅगस्ट महिन्यात तरी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन मिळेल. ४६९ शाळा आणि इतर अनेक शाळा त्रयस्थ समितीने पात्र असतानाही अपात्र केल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यामुळे अशा शाळांना त्रुटी पूर्ततेसाठी आणखी एक संधी देण्याची मागणी समितीने केली आहे.अंतिम दिवशी तांत्रिक बिघाडामुळे काही शाळांनी आॅनलाइन अपूर्ण राहिलेल्या शाळांची हार्ड कॉपी प्रस्ताव मुदतीमध्ये जमा केली. त्याची रीतसर तपासणीही झाली. मात्र संबंधित शाळा पात्र की अपात्र याचा कोणताही खुलासा करण्यात आला नाही. त्यामुळे ज्या शाळा तपासणीत पात्र ठरल्या असतील, त्यांची यादी घोषित करण्याची मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे.