कोल्हापूर : न्यायालयाची स्थगिती उठताच प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्या करण्यात येतील, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांना पटाची अट न ठेवता मुख्याध्यापकपदास मंजुरी द्यावी, या मागणीसाठी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही निवेदन देण्यात आले.शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंडे यांची भेट घेतली. शिक्षकांचा पगार वेळेवर होत नाही, गेले तीन महिने राज्यातील सर्व शिक्षक पगारापासून वंचित आहेत. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. त्याचबरोबर मे महिन्यात शिक्षकांच्या विनंती व आपसातील बदल्या होणार होत्या; पण त्या न्यायालयाच्या आदेशामुळे थांबविण्यात आल्या आहेत. स्थगितीचा आदेश उठताच बदल्या कराव्यात, अशी विनंतीही पंकजा मुंडे यांच्याकडे करण्यात आली. या शिष्टमंडळाने विनोद तावडे यांनाही एक निवेदन दिले. शाळेचे प्रशासन, बांधकाम, शालेय पोषण आहार या जबाबदारीच्या कामांसाठी मुख्याध्यापकपदास मंजुरी देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.
स्थगिती उठताच शिक्षकांच्या बदल्या
By admin | Published: May 26, 2015 1:53 AM