मुंबई : देशभरातील शिक्षकांच्या आणि शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी, केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करण्याची मागणी करत, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने, सोमवारी आझाद मैदानात धरणे धरले. आयोग स्थापनेच्या मागणीसाठी संघाची शिखर संघटना असलेल्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने, ५ आॅक्टोबरला दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. त्यात राज्यातील हजारो प्राथमिक शिक्षक सामील होतील, अशी माहिती केंद्रीय संघाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा सुलभा दोंदे यांनी दिली.दोंदे म्हणाल्या की, सर्व राज्यांतील प्रतिनिधींची संयुक्त बैठक ३० डिसेंबर २०१६ रोजी झाली होती. त्यात केंद्रीय पातळीवर आंदोलनाची घोषणा करण्यात आली. त्या आधी सरकारला इशारा देण्यासाठी मार्च २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते मनुष्यबळ विकासमंत्री, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदने देण्यात आली. त्यानंतर, संपूर्ण देशात एकाच दिवशी २५ एप्रिलला तालुकानिहाय आणि ५ आॅगस्टला जिल्हानिहाय धरणे आंदोलन करण्यात आले. तरीही केंद्र शासनाला जाग आलेली नाही.या आंदोलनाच्या निमित्ताने राष्ट्रीय शिक्षण आयोगासह जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी शिक्षण संघाने केली आहे, तसेच सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून, सातवा वेतन आयोग १ जानेवारी, २०१६ पासून लागू करण्याचा निर्णय लवकर घोषित करण्याचे आवाहन शिक्षक संघाने केले आहे.>६ आॅक्टोबरला ठरविणार पुढील दिशाराज्यभरातील जिल्हाधिकाºयांमार्फत शिक्षकांनी पंतप्रधान मोदी यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास ५ आॅक्टोबरला दिल्लीला धरणे धरण्यात येईल. त्यानंतर, ६ आॅक्टोबरला दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होईल. त्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे संघाने स्पष्ट केले.
शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी शिक्षक दिल्लीला धडकणार, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 5:29 AM