नागपूर : राज्यातील अंशकालीन शिक्षकांना नियमित करण्यासाठी त्यांच्याकडून जर खरोखरच प्रत्येकी पाच हजार रुपये घेण्यात आले असतील तर ही गंभीर बाब आहे. यासंबंधात सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीला शोधून कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिली.रामनाथ मोते यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना व नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा यांच्यावर तावडे यांनी संयुक्तपणे उत्तर दिले. राईट टू एज्युकेशनच्या (आरटीई) अंमलबजावणीनंतर शिक्षकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली. राज्यात आजच्या तारखेत ४७ हजार ५०८ अतिरिक्त शिक्षक आहेत. परंतु यातील एकाही शिक्षकाचे वेतन थांबविण्यात आलेले नाही. एकाही शिक्षकाची नोकरीदेखील जाणार नाही, अशी ग्वाही तावडे यांनी दिली. एकूण १८८ सहायक शिक्षकांंपैकी ९० जणांकडे तीन वर्षांहून कमी अनुभव आहे. त्यांनादेखील समायोजित करण्याचा विचार सुरू आहे, असे ते म्हणाले. पुढील वर्षीपासून समायोजन प्रक्रियेत गोंधळ होऊ नये याकरिता जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक, अध्यक्ष, ज्या शाळेत शिक्षकांना समायोजित करण्यात येणार आहे, तेथील मुख्याध्यापक यांची एकत्रित बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
शिक्षकांकडून पैसेवसुलीच्या प्रकरणाची चौकशी करणार
By admin | Published: December 19, 2014 4:48 AM