मुंबई : मुंबईतील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील सन २०१५-१६ व त्याआधीच्या वर्षांतील भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) स्लिप शिक्षकांना देण्यासाठी शिक्षण निरीक्षक कार्यालयाने विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचा फायदा मुंबईतील ७६ शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनाही पीएफ स्लिप मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने विभागाकडे पाठपुरावा केला होता.शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, शिक्षण निरीक्षक कार्यालयासोबत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षक परिषदेने ६ मार्च रोजी सहविचार सभा आयोजित केली होती. त्या सभेत शिक्षकांच्या पीएफ स्लिप मिळत नसल्याचा मुद्दा समोर आला होता. अनेक शाळांमधील शिक्षकांना पीएफ स्लिप मिळत नसल्याच्या तक्रारी विविध शाळांमधील शिक्षकांनी परिषदेकडे केल्या होत्या. सहविचार सभेत त्यावर चर्चा झाल्यानंतर शिक्षक परिषदेने वेतन व भविष्य निर्वाह निधी विभागाकडे पाठपुरावा करून शिबिरा घेण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने ९ ते २९ मार्चपर्यंत चेंबूर येथील शिक्षण निरीक्षक कार्यालयात शिबिराचे आयोजन केले आहे.
शिक्षकांना मिळणार पीएफ स्लिप
By admin | Published: March 14, 2017 7:37 AM