नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकांत शिक्षकांना निवडणूक अधिकाऱ्याच्या आदेशानुसार कामे करावी लागणार, असे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी स्पष्ट केले. त्यामुळे, शिक्षकांना निवडणूकीची कामे तूर्तास तरी करावीच लागतील.शिक्षकांना निवडणुकीची कामे देण्यात येऊ नये, या विनंतीसह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष आमदार नागो गाणार यांनी रिट याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी गुरुवारी दोन्ही याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. तसेच प्रकरणावर २४ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित करून, यादरम्यान निवडणूक आयोगासह अन्य प्रतिवादींना उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकांचा निवडणुकीसह अन्य कोणत्याही कामासाठी उपयोग करणे अनुचित आहे. त्यांना केवळ शिक्षणाचेच काम करू दिले पाहिजे, असे परिषदेचे म्हणणे आहे. गेडाम यांना ३१ जानेवारी रोजी पत्र पाठवून निवडणुकीच्या कामासाठी बोलावले आहे. त्यावर गेडाम यांचा आक्षेप आहे. विनाअनुदानित संस्थेत कार्यरत असल्यामुळे आपल्याला निवडणुकीच्या कामामध्ये गुंतविता येणार नाही. कायद्यात यासंदर्भात तरतूद नाही, असा दावा त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
निवडणुकीची कामे शिक्षकांना तूर्तास करावीच लागणार
By admin | Published: February 17, 2017 2:53 AM