प्रदीप शिंदे, कोल्हापूरपुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शिक्षकांना राज्यभरात एकाच वेळी आॅनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता राज्यावरून जिल्हा आणि जिल्ह्यावरून तालुकास्तरावर प्रशिक्षकांची होणारी वारी यंदापासून बंद होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षक एकाच वेळी प्रशिक्षणाचे धडे गिरविणार आहेत. आॅनलाईन प्रशिक्षणाचा महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांची पाठ्यपुस्तके बदलण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाने घेतला आहे. यात पहिल्या दोन वर्षांत पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गांचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. यंदा २०१५-१६ या वर्षात पाचवीच्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. अभ्यासक्रम बदललेल्या वर्गांच्या शिक्षकांना शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते. ते प्रशिक्षण यंदाप्रायोगिक तत्त्वावर आॅनलाइन पद्धतीने होणार आहे.पुणे किंवा नाशिक येथून एकाच वेळी २७ एप्रिल ते ३ मे दरम्यान हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना आॅनलाईन प्रश्नोत्तरेदेखील विचारण्याची सुविधा केली आहे. त्यामुळे एका तालुक्यातील शिक्षकांचा प्रश्न अन्य जिल्ह्णांतील शिक्षकांना कळणार आहे.
शिक्षक घेणार आॅनलाइन धडे!
By admin | Published: April 25, 2015 4:04 AM