मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जीवनाची प्रेरणा असून, समाज निर्मितीचे आदर्श मॉडेल हे जगाला दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय नौकानयन आणि रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. आरएसएसचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेश मेहता यांनी लिहिलेल्या ‘विश्वातील अद्वितीय संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या चार भाषांतील पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात शनिवारी रात्री पार पडला. या वेळी गडकरी बोलत होते.गडकरी म्हणाले की, ‘सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास बाळगून ज्ञान, विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानांचा त्रिवेणी संगम साधण्याची संघाची मूल्यवर्धित शिक्षणपद्धती आहे. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याची हीच पद्धती देशाला समृद्धीकडे आणि राष्ट्राच्या पुनर्निर्माणाकडे घेऊन जाते. या पुनर्निर्माणात दलित, दिव्यांग, गरीब यांचे जीवन सुखदायक होण्याची कास धरणारे आणि त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा देण्याची शिकवण पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी संघाला दिली. या शिकवणीचे तंतोतंत पालन संघाचे कार्यकर्ते करत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. मात्र, संघ हा केवळ हिंदू, हिंदुत्ववादी आणि जातीयवादी असून, संघाचे स्वयंसेवक अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचा अपप्रचार केला जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सामान्य व्यक्ती ही असामान्य होऊन जीवन जगण्याचा मार्ग स्वयंसेवकाला मिळतो, म्हणूनच आज मी जो काही आहे, तो संघामुळेच असल्याचे सांगत, त्यांनी संघाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली.राज्यपाल राम नाईक यांनी जनसंघ आणि शिवसेनेच्या विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला. संघाची स्थापना, संघ आणि भाजपा कसा वाढला? याची सत्य माहिती या पुस्तकात असल्याचे सांगून सामान्य असलेला मित्र रमेश मेहता हा संघाच्या शिकवणीमुळे असामान्य झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या वेळी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा, संघाच्या कोकण प्रांताचे संघचालक डॉ. सतीश मोड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संघाची विचारधारा देशासाठी आदर्श मॉडेल
By admin | Published: May 01, 2017 4:24 AM