ठाणे : आपल्या संविधानात तिरंगा राष्ट्रध्वज आणि जन गण मन या दोन्हींना महत्त्व आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न करीत आहे. तिरंगा राष्ट्रध्वजाऐवजी भगवा ध्वज आणि जन गण मन या राष्ट्रगीताऐवजी वंदे मातरम् हे गीत आणून संविधानाचे भगवेकरण ते करू पाहत आहेत. त्यांचे हे कृत्य संविधानविरोधी असल्याने त्यांना देशद्रोही ठरवावे, असे प्रतिपादन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताबाबत केलेल्या वक्तव्यावर आव्हाड पत्रकारांशी बोलत होते. जन गण मन या राष्ट्रगीताऐवजी वंदे मारतम् हे नवे राष्ट्रगीत बनवावे तसेच भगव्या झेंड्याला राष्ट्रध्वज मानावे, अशी वादग्रस्त मागणी केली आहे. त्यांच्या या विधानाचा आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही मागणी देशविरोधी आहे. संविधानाने तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला. तसेच जन गण मन हे राष्ट्रगीत म्हणून सामावून घेतले. या दोन्ही गोष्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य नाहीत. त्यांनी कधी देशाचा ध्वज सन्मानाने फडकवला नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात कधी सहभाग घेतला नाही. ते आज देशभक्ती शिकवत आहेत. त्यांना हा देश भगवा करायचा आहे, अशी वादग्रस्त वक्तव्ये करून या देशात विषाचे वातावरण पसरवायचे आहे. दुर्दैवाने अशा फुटीरतावादी विचारांवर चालणाऱ्यांची सत्ता या देशात आल्याची टीका त्यांनी केली. संघाची अशी वक्तव्ये संविधानविरोधी आहे. त्यामुळे जोशी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तशी हिंमत या सरकारमध्ये आहे का,असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)
संविधानाचे भगवेकरण करण्याचा संघाचा प्रयत्न
By admin | Published: April 03, 2016 3:51 AM