खोडद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांच्या यात्रा रद्द झाल्या आहेत. यामुळे या गावांमध्ये आयोजित केलेले लोकनाट्य तमाशांचे कार्यक्रमदेखील रद्द झाले आहेत. कोरोनामुळे तमाशाच्या बुकिंगवर परिणाम तर झालाच, पण आतापर्यंत सुमारे १५० तमाशा कार्यक्रमांचे झोलेले बुकिंग रद्द झाल्याने फडमालक चिंतातुर झाले आहेत. मागील ६० वर्षांच्या काळात तमाशा फडमालकांवर पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे. कोरोनाच्या सावटाचा कोट्यवधी रुपयांचा फटका तमाशा फडमालकांना बसणार आहे.तमाशाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगावमध्ये सुमारे ३५ तमाशा फडांच्या राहुट्या लागल्या आहेत. जिल्ह्यातील यात्रा हंगाम हा वैशाख पौर्णिमेपर्यंत असतो. गुढी पाडवा, अक्षयतृतीया, कालाष्टमी आणि चैत्रपौर्णिमा हे दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. तमाशा फडाची सुपारी कमीतकमी ९० हजार ते ३ लाख रुपयांपर्यंत आहे. दरवर्षी वैशाख पौर्णिमेपर्यंत सर्व तमाशा फडांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.अनेक तमाशा फडमालक कर्जबाजारी आहेत. अनेक कलावंतांना आगाऊ उचल द्याव्या लागतात. एका कलावंताला किमान ५० हजार रुपये उचल द्यावी लागते. वर्षभर कलावंतांना सांभाळावे लागते. सध्याचा या यात्रांच्या हंगामात या तमाशा फडमालकांची संपूर्ण वर्षाची आर्थिक उलाढाल अवलंबून असते. मात्र या वर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे तमाशा फडमालकांसमोर जगावं कसं? हा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रत्येक तमाशा फडाचा खर्च किमान ७० हजार रुपये आहे. प्रत्येक फडाचे दरवर्षी या यात्रा हंगामात ४० ते ५० कार्यक्रम होतात. यावर्षी ही संख्या १५ ते २० वर आली आहे. दर वर्षी आजपर्यंत ७०० ते ८०० कार्यक्रम बुकिंग होत असतात. या वर्षी केवळ ३५० कार्यक्रम बुक झाले आहेत. विशेष म्हणजे त्यातील सुमारे १५० कार्यक्रम रद्द झाले आहेत.लोकनाट्य तमाशाचे कार्यक्रम होत नसल्याने आणि होणारे कार्यक्रम रद्द झाल्याने कलावंत आणि मजुरांना घरी पाठविण्याची वेळ फडमालकांवर आली आहे. या कलावंतांना आणि मजुरांना घरी पाठवायचे म्हटले तरी त्यांना उदरनिर्वाहासाठी पैसे द्यावे लागतात. एका तमाशा फडात मजूर आणि कलावंतांसह सुमारे १५० लोक असतात. एका तमाशा फडावर ६०० ते ७०० लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. .......आधीच कर्जबाजारी असलेला तमाशा फड आणखी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. बुकिंग रद्द झाले म्हणून मजुरांचा व कलावंतांचा रोजचा खर्च थांबलेला नाही. तमाशा फडमालकांवर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. शासनाने तमाशा फडांना आर्थिक मदत करावी.’- मोहित नारायणगावकर, संचालक, विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ............
कोरोनामुळे तमाशा फडमालकांच्या डोळ्यात अश्रू ; यात्रेतील सुमारे १५० च्यावर सुपाऱ्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 1:39 PM
अनेक गावांच्या यात्रा झाल्या रद्द, कोट्यवधींचा फटका
ठळक मुद्देगुढी पाडवा, अक्षयतृतीया, कालाष्टमी आणि चैत्रपौर्णिमा हे दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. तमाशा फडाची सुपारी कमीतकमी ९० हजार ते ३ लाख रुपयांपर्यंततमाशा फडावर ६०० ते ७०० लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून