मुंबई : प्रवासी क्षमता वाढवतानाच एसटीचा चालनीय खर्च कमी व्हावा, या उद्देशाने एसटी महामंडळाकडून डबल डेकर बस प्रवाशांच्या ताफ्यात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु बस चालवताना अनेक तांत्रिक अडथळे आहेत. याबाबत एसटीच्या एका विभागाकडूनच मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे आणि यावर आता एसटी महामंडळालाच अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. एसटी महामंडळाकडे जवळपास १७ हजार बसगाड्या आहेत. यात सेमी, साध्या, मिडी बसेसबरोबरच एसी बसचाही समावेश आहे. महामंडळाने नुकत्याच स्वत:च्या मालकीच्या ७० एसी बस विकत घेतल्या, तर आणखी १ हजाराहून अधिक बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येतील. त्यादेखील लवकरच ताफ्यात येणार आहेत. प्रवाशांना जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी महामंडळाकडून नवीन बसगाड्यांचे धोरण ठेवण्यात आले आहे. गर्दीचा असो वा कमी गर्दीचा हंगाम एसटीला एकाच मार्गावर अनेक बसेस सोडाव्या लागतात. त्यामुळे चालनीय खर्च बराच वाढतो. एकूणच होणारा खर्च आणि जास्तीत जास्त प्रवाशांची वाहतूक करता यावी, या उद्देशाने डबल डेकर बस चालविण्याचा पर्याय महामंडळाकडून शोधण्यात आला आहे. गेल्या सात वर्षांत डबल डेकर बस चालविण्याचा पर्याय निवडण्यात आला, परंतु त्याला मूर्त रूप देण्यात आले नाही. अखेर पुन्हा एसी डबल डेकर बस चालविण्याचे स्वप्न बाळगण्यात आले आहे. यासाठी व्होल्वो, स्कॅनियाशी बोलणीही सुरू केली. मात्र, त्यांच्याकडूनही काही मुद्दे उपस्थित करतानाच, एसटीच्या एका विभागाकडूनही तांत्रिक मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. डबल डेकर बस चालवायची असल्यास घाटातून चालविताना बरेच अडथळे येतील. (प्रतिनिधी)वेगाचा प्रश्न बिकटही बस घाटातून चालविताना मधोमधच चालविली पाहिजे, जेणेकरून एखाद्या वळणावर तिला अपघात होता कामा नये. त्याचप्रमाणे, सध्याच्या एसटीच्या साध्या, निमआराम व एसी बसला वेळ ठरवून दिलेली असून, त्यांची रचना पाहता या बसेस वेळेत पोहोचतात आणि सुटतात. परंतु डबल डेकर बसने तेवढा पल्ला वेळेतच गाठणे आवश्यक आहे आणि तो वेग डबल डेकर बस पकडू शकते का, हा मोठा प्रश्न असल्याचे मांडण्यात आले आहे. यावर आता एसटीच्या अध्यक्षांकडूनच अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे.
डबल डेकर बस चालविण्यास तांत्रिक अडथळे
By admin | Published: December 29, 2016 1:55 AM