पिंपरी : राज्यात तांत्रिक बिघाडामुळे कोट्यवधी नागरिकांना अंधारात काढावे लागत आहे. महावितरणने प्रसिद्ध केलेल्या ऑक्टोबर आणि डिसेंबर २०१९च्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.
तांत्रिक बिघाडामुळे मुंबईत रविवारी काही तास वीज पुरवठा खंडित झाला होता. ऊर्जा मंत्र्यांनी त्याची तातडीने दखल घेत अशी घटना घडू नये या साठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र तांत्रिक बिघाड सातत्याने होत असून , हजारो तास ग्राहकांना अंधारात बसावे लागते आहे.
महावितरणने ऑक्टोबर आणि डिसेंबर २०१९ या महिन्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील तांत्रिक बिघाडाची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात राज्यात तांत्रिक बिघाडाच्या १५ हजार ७४५ घटना घडल्या. त्यामुळे चार कोटी दहा लाख अठ्ठावीस हजार (४,१०,२८,४५७ ) नागरिकांना २० हजार १७६ तास अंधारात बसावे लागले. महाराष्ट्रात महावितरणला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या पुणे विभागाचीही तीच अवस्था आहे. ऑक्टोबर २०१९मध्ये पुण्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या १ हजार ३७८ घटना घडल्या. त्यामुळे पुणेकरांना १ हजार ६८७ तास अंधारात बसावे लागले.
डिसेंबर २०१९ च्या माहितीनुसार रराज्यात तांत्रिक बिघाडाच्या १० हजार ९९४ घटना घडल्या. त्याचा राज्यातील पावणेतीन कोटी ( २,७८,१२,५८८)
नागरिकांना फटका बसला. या ग्राहकांना १५ हजार १६७ तास अंधारात बसावे लागले. डिसेंबर २०१९ मध्ये पुण्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या ७१३ घटना घडल्या. त्यामुळे पुणेकरांना ८८९ तास अंधारात बसावे लागले.
दर महिन्याला हा चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे महावितरणसाठी बंधनकारक आहे, मात्र जानेवारी २०२० पासून आजतागायत हा चार्टही प्रसिध्द झाला नसल्याची माहिती सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी दिली.
------
महावितरणने दरमहा तांत्रिक बिघाडाची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. गेल्या ३ वर्षांची माहिती त्यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार तांत्रिक बिघाडामुळे होणारा अंधार उर्वरित महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेला असल्याचे दिसून येते. या व्यतिरिक्त देखभाल दुरुस्ती साठी आठवड्यातून एक दिवस ( पुण्यात गुरुवारी) काही तासांचा नियोजनबद्ध अंधार असतो. त्यामुळे मुंबई प्रमाणे उर्वरित महाराष्ट्राकडे लक्ष देऊन तांत्रिक अंधारातून नागरीकांची सुटका करावी.
विवेक वेलणकर
अध्यक्ष, सजग नागरीक मंच